Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) असा थेट सामना असला तरी, आघाड्यांमधील घटक पक्षांमध्येही जोरदार चुरस आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर आणि राजकीय मानापमानास ऊत आला आहे. धक्कादायक म्हणजे पक्षांतर्गत संघर्ष कमी होता की, काय म्हणून आता चक्क मित्रपक्षांचा त्रास होतो म्हणूनही राजकीय नेते पक्षास सोडचिठ्ठी देऊ लागले आहेत. ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळे यांच्या रुपात हे उदाहरण पुढे आले आहे. प्रदीर्घ काळ भाजप मध्ये राहिलेले ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार () हेच आपल्याला त्रास देत असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर, त्यांच्या त्रासामुळेच आपण पक्ष सोडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ढोबळे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षात प्रवेश घेत तुतारी हाती घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या निर्णयाने महायूतीस मात्र मोठाच धक्का बसला आहे.

महायुतीमध्ये अस्वस्थता

अजित पवार यांची महायुतीमध्ये एन्ट्री झाल्यापासून राज्यातील राजकीय गणीते आणखीच बिघडली आहेत. ज्या अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली, त्याच अजित पवार यांना भाजपने सोबत कसे काय घेतले? इतकेच नव्हे तर त्यांना सत्तेतही स्थान दिले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता आहे. शिवाय, महायुतीमध्ये प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात जागावाटपावरुन आगोदरच रस्सीखेच असताना अजितदादांचा राष्ट्रवादीही त्यात वाटेकरी झाला. यावरुनही या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. परिणामी, अनेक विद्यमान आमदार आणि काही प्रमुख नेत्यांचा पत्ताक कट होण्याची शक्यता आहे. आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झाल्याने अनेकांनी महाविकासआघाडीची वाट धरली आहे. परिणामी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Pune: पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; Deepak Mankar यांना आमदारकी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 600 हून अधिक कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा)

शरद पवार यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग

दोन दिवसांपूर्वीच माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर पुढच्या काहीच तासांमध्ये लक्ष्मण ढोबळे यांनी पवारयांची भेट घेतली आहे. ते मोहोळ मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते. ढोबळे हे विधानसभा निवडणूक 2019 च्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले होते. मात्र, पक्षात येऊन दहा वर्षे झाली. तरीदेखील पक्षाने डावलले जात असल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मतदान तारीख, मतमोजणी आणि प्रक्रिया ECI द्वारे जाहीर)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अजित पवार आपल्याला त्रास देत होते. त्यांच्या त्रासाल कंटाळून आपण भाजपमध्ये आलो. पण, आता ते भाजपसोबत आल्यावर पुन्हा त्रास देऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळूनच आपण भाजप सोडत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश घेत तुतारी हाती घेत असल्याचे ढोबळेयांनी म्हटले आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल, पण आता आपण तुतारीच हाती घेणार असल्याचा आत्मविश्वासही ढोबळे यांनी या वाहणीशी बोलताना व्यक्त केला आहे.