महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली असून विविध कारणांनी बेपत्ता महिला परत येण्याची टक्केवारी देशाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी अधिक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुरक्षेबाबतचा दृष्टीकोन हा अधिक महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीला सुरक्षित वाटणे महत्त्वाचे असते. मुंबई ही इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत महिलांना अधिक सुरक्षित वाटते.
महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. राज्यात दर लाख गुन्ह्यांमागे भादंविच्या गुन्ह्यांचे प्रमाणे 294.3 इतके आहे. यात राज्याचा क्रम देशात दहावा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यात यावर्षी खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यामध्ये 5,493 गुन्ह्यांची घट आहे. महिला आणि बालकांवरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे. तर, बाललैंगिक गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक 17 व्या क्रमांकावर आहे. महिला बेपत्ता होण्याची विविध कारणे आहेत, त्यात परत आलेल्या महिलांचे प्रमाण सरासरी 90 टक्क्यांपर्यंत जाते. हे प्रमाण 96-97 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.
देशातील इतर राज्याच्या तुलनेत महिला परत येण्याचे हे प्रमाण 10 टक्के जास्त आहे. बालकांच्याबाबत राज्याने केलेली कामगिरी चांगली आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’च्या माध्यमातून 34 हजारांपेक्षा अधिक बालकांना त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविण्यात यश आले असून हे प्रमाण 96 टक्क्यांपर्यंत जाईल. हे प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.
महिला अत्याचारासंदर्भात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार तातडीने गुन्हा दाखल होऊन 60 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करुन गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अपहरणासंदर्भात राज्याचा क्रमांक 10 वा असून राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असे चित्र निर्माण होणे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. राज्यात गुन्हेगारांवर जरब आणण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. अंमलीपदार्थांचा अंमल सर्वत्र वाढताना दिसत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून संयुक्त कारवाई सुरू असून शाळांच्या परिसरातील टपऱ्या उद्धवस्त केल्या जात आहेत. कफ सिरपचा दुरूपयोग होत असल्याने औषधी दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले असून अवैध दारू विक्री, जुगार यावरही कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Mumbai Hijab Row: 'बुरखा घातलेल्या मुली कॅम्पसमध्ये येऊ शकतात, मात्र वॉशरूममध्ये त्यांना तो बदलावा लागेल'; कॉलेज प्रशासनाचा आदेश)
सायबर आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी विविध ठिकाणी पोलीस स्थानकांची निर्मिती करण्यात येत असून आदर्श कार्यप्रणाली लागू करण्यात येत आहे. नक्षलग्रस्त भागात 57 कोटींचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. डायल 112 मुळे प्रतिसादाची वेळ कमी झाली असून आता 8.14 मिनिटांवर आला आहे. सीसीटीएनएस-2 चे काम सुरू झाले आहे. यामुळे मोबाईल ॲपद्वारे काम होणार असून केस डायरी डिजिटल होणार आहे. यामुळे माहिती देखील तत्काळ उपलब्ध होणार आहे.