Hijab (File Image)

मुंबईतील (Mumbai) चेंबूर आणि डीके मराठा कॉलेजमध्ये सुरू झालेला हिजाब वाद (Hijab Row) आता संपुष्टात आला आहे. विद्यार्थी आणि प्रशासन या दोघांनी वादाबाबत मध्य साधून  वाद संपवला. प्रशासनाने म्हटले आहे की, विद्यार्थिनी बुरखा घालून कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतील, मात्र त्यांना वॉशरूममध्ये बुरखा चेंज करावा लागेल. अशाप्रकारे हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश न देण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने मागे घेतला आहे.

आपल्या संस्थेत येत्या 8 ऑगस्टपासून गणवेश धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार असल्याचे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला ड्रेसकोडशिवाय कॅम्पसमध्ये प्रवेश करता येणार नाही, असे कॉलेज प्रशासनाने सांगितले.

याआधी कॉलेज प्रशासनाने अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत त्यांनी सांगितले होते की, सर्व विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये निर्धारित गणवेश परिधान करून यावे लागेल. ज्यावर मुस्लिम समाजातील विद्यार्थिनींनी आक्षेप घेतला होता. चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयात (Chembur’s Acharya College) शिकणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींच्या एका गटाला बुरखा घालून संस्थेत प्रवेश करण्यास मनाई केली गेली. यावेळी कॉलेजमध्ये प्रवेश देण्यासाठी बुरखा काढण्याची सूचना देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थिनींनी सांगितले की त्या गणवेश घालण्याच्या विरोधात नाहीत, मात्र त्यांची परिस्थिती समजून महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालयापर्यंत बुरखा घालण्याची परवानगी द्यावी. महाविद्यालयात आल्यानंतर त्या तो वॉशरूममध्ये बदलतील. एका विद्यार्थिनीने सांगितले की, त्या कॉलेजमध्ये गेल्यावर बुरखा काढणार होत्या, मात्र त्यांना गेटच्या बाहेर तो काढण्याची भीती वाटत होती. विद्यार्थिनींचे हे म्हणणे मान्य करण्यास कॉलेजने आधी नकार दिला होता, मात्र विरोध वाढल्यानंतर कॉलेजने यासाठी होकार दिला. (हेही वाचा: Burqa-Clad Muslim Students Denied Entry: मुंबईमधील चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयात बुरखा घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला; व्हिडिओ व्हायरल, निषेध सुरु)

बुरखा घालणाऱ्या मुलींनी सांगितले की, त्यांचा नवीन ड्रेस आता क्रीम रंगाचा कुर्ता असेल आणि त्यांच्या सलवारचा रंग निळा असेल. 11वीच्या विद्यार्थ्यांनी अद्याप कॉलेज सुरू केले नसून 12वीच्या विद्यार्थ्यांनी हा ड्रेस घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र, विद्यार्थिनींचा एक भाग अजूनही त्यांना शाळेत बुरखा घालण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत आहे.