
लातूर महानगरपालिका (Latur Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे (Babasaheb Manohare) यांनी आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempts) केला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक म्हणजे त्यांनी आपल्या राहत्या घरी पिस्तुलाने डोक्यात डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या. ही घटना काल (शनिवार, 5 एप्रिल) रात्री घडली. बंदुकीचा आवाज आल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली असता, ते रक्ताच्या थारोळ्यात आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असलेल्या आयुक्तांनी अशा प्रकारची कृती केल्याने कुटुंबीयच काय लातूर (Latur News) शहर हादरुन गेले आहे. त्यांनी इतके टोकाचे पाऊल नेमके का उचलले याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आयुक्तांवर वैद्यकीय उपचार
लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच, कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल केले. बंदुकीची गोळी डोक्याला उजव्या बाजूला लागली. ही गोळी आरपार गेली असल्याने प्रचंड प्रमाणावर रस्तस्त्राव झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी माहिती देताना सांगितले की,रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करत संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते वैद्यकीय उपचारांस प्रतिसाद देत आहेत. (हेही वाचा, Latur News: उपचारादरम्यान निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टर पती-पत्नीस 40 लाख रुपयांचा दंड)
काय घडलं नेमकं?
आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, प्राप्त माहिती अशी की, त्यांचा दिवस नेहमीप्रमाणेच दैनंदिन होता. रात्री घरी आल्यावर त्यांनी सर्वांसोबत जेवण केले. जेवताना गप्पाही मारल्या. त्यानंतर ते झोपण्यासाठी म्हणून स्वत:च्या खोलीमध्ये गेले. त्यांना रुममध्ये जाऊन थोडाच वेळा झाला असेल, इतक्यात त्यांच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीत धाव घेतली असता ते रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. कुटुंबीयांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा, Latur News: दुचाकीची तोडफोड करणारे दोन पोलिस निलंबित; लातुर मधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
आयुक्तांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती कळताच लातूर महानगरपालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्याद्री हॉस्पिटलकडे धाव घेतली. दरम्यान, लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि इतरही काही वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, एखाद्या इतक्या वरीष्ठ अधिकाऱ्याने इतके टोकाचे पाऊल कसे उचलले याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.