Kolhapur Shocker: 'माझा नवरा मुलीसारखे कपडे परिधान करतो'; पत्नीने केला धक्कादायक खुलासा, 2 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
Crossdressing (प्रातिनिधिक-संग्रहितसंपादित प्रतिमा)

आजकाल घटस्फोटाचे प्रमाण बरेच वाढले आहे. वैवाहिक जीवनात अशा अनेक समस्या उद्भवतात, ज्यामुळे पती-पत्नी वेगळे होण्याचा निर्णय घेतात. यातील काही गोष्टी खूपच छोट्या असतात मात्र काही गोष्टींना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतून (Mumbai) समोर आला आहे. येथे एका पत्नीने आपल्या पतीबाबत जो खुलासा केला आहे, तो ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

मिड डेच्या वृत्तानुसार, घाटकोपरमधील एका महिलेचे म्हणणे आहे की, तिचा नवरा एखाद्या महिलेप्रमाणे कपडे परिधान करतो व ही गोष्ट तिच्यासाठी धक्कादायक होती. तिने सांगितले की, 2021 मध्ये तिचे लग्न कोल्हापुरातील एका पुरुषाशी झाले होते. तिच्या घरच्यांनी तिचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात केले होते. पण लग्नाचा आनंद फार काळ टिकला नाही. महिलेचा आरोप आहे की, एका रात्री तिने पाहिले की तिचा नवरा वधूचा पोशाख परिधान करत आहे. ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

महिलेच्या म्हणण्यानुसार, हे कपडे तिच्या लग्नाचे कपडे होते. त्या रात्री नवऱ्याने एखाद्या मुलीसारखा मेकअप केला होता आणि रात्री तो तसाच झोपला होता. दुसऱ्या दिवशी तिने याबाबत सासू-सासऱ्यांना माहिती दिली. तेव्हा सासू म्हणाली की ही त्याची जुनी सवय आहे. या घटनेनंतर तिने घाटकोपर येथे तिच्या पालकांकडे तसेच इतर नातेवाईकांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर पतीने व सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. (हेही वाचा: Nashik: पत्नीच्या चेहऱ्याला फासले काळे, गळ्यात चपलांचा हार घालून काढली गावभर धिंड, चांदवड तालुक्यातील घटना)

महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या पतीच्या कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी तिच्या गरोदरपणाची अफवा पसरवली. इतकेच नाही तर तिच्या निष्काळजीपणामुळे तिचा गर्भपात झाल्याचेही सांगितले. याबाबत तिने पतीकडे तक्रार केली असता त्याने तिला मारहाण केली. महिलेचे म्हणणे आहे की, मारहाणीनंतर काही दिवसांनी ती घाटकोपरला तिच्या माहेरी परत आली.

त्यानंतर परत सासरी गेल्यावर तिने कोल्हापूरच्या सदर बाजार पोलिसांशी संपर्क साधला होता, मात्र सासरे श्रीमंत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असा पीडितेचा आरोप आहे. आता याबाबत घाटकोपर पोलीस स्थान्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला व तिच्या माहेरच्या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मोठ्या अपेक्षेने मुलीचे लग्न लावून दिले होते, मात्र त्यांची फसवणूक झाली आहे, त्यांच्या मुलीवर अत्याचार झाला आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.