![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/02/Nashik-Dhind-380x214.jpg)
पतीच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या विधवा सुनेच्या (Nashik) चेहऱ्याला काळे फासून तिची गावभर धिंड (Dhind) काढल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील चांदवड (Chandwad Taluka) तालुक्यात घडला आहे. पीडित महिलेने पतीच्या निधनाबद्दल संशय व्यक्त केल्याने साररच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबत हे कृत्य केले. दरम्यान, पीडित महिलेने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, सदर घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चांदवड तालुक्यातील शिवरे गावातील एका व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीने आत्महत्या केली तेव्हा त्याची पत्नी माहेरी होती. त्यामुळे पतीच्या अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधीवेळी पत्नी माहेरहून सासरी आली. तिने आपल्या पतीने आत्महत्या केली नसून, त्याचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त केला. तसेच, या प्रकरणाची चौकशी करावी अशीही मागणी तिने केली. या वेळी तिच्या मागणीचा सासरच्या मंडळींना प्रचंड राग आला. राग अनावर झाल्याने त्यांनी सून असलेल्या या महिलेच्या तोंडाला काळे फासले आणि तिची गावभर धिंड काढली. तिच्या गळ्या चपलांचा हारही घालण्यात आला होता. (हेही वाचा, Daughter-In-Law's Second Marriage: विधवा सुनेचे सासूकडून कन्यादान, पुणे येथील सकारात्मक घटना)
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील शिवरे गावात राहणाऱ्या या महिलेचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे तिला आराम पडावा यासाठी पतीने तिला माहेरी सोडले होते. माहेरी उपचार आणि आराम घेत असतानाच तिच्या पतीने आत्महत्या केल्याची बातमी आली. त्यामुळे पतीच्या अंतिम विधीसाठी ही महिला गावात पोहोचली. परंतू, तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी तिला मारहाण करत तिच्यासोबत हे कृत्य केले.
व्हिडिओ
पीडित महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सासरच्या मंडळींनी केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. तसेच, आपला पती आत्महत्या करु शकत नाही. त्याचा घातपातच झाला असावा. आपल्याला पूर्ण खात्री आहे आपला पती आत्महत्या करुच शकतनाही. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा, अशी मागणी या महिलेने केली आहे.