अश्विनी भिडे यांच्या बदली नंतर किरीट सोमय्या आक्रमक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल
Kirit Somaiya, Ashwini Bhide (Photo Credits: PTI, Twitter)

BJP Leader Kirit Somaiya On Ashwini Bhide's Transfer: मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांच्या हातून एमएमआरसीएलचा पदभार 21 जानेवारी रोजी काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंग देओल यांना आणण्यात आलं आहे. अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असल्याने आता रणजीतसिंग मेट्रो ३ च्या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकाचा पदभार सांभाळणार आहेत.

अश्विनी भिडे यांना त्यांच्या पदावरून हटवल्यामुळे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकासआघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. झी 24 तास या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे सरकारने संकुचित राजकारणापोटी मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून अश्विनी भिडे यांना दूर केले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या असंही म्हणाले की, "अश्विनी भिडे यांच्या कार्यकाळात मुंबई मेट्रोच्या कामाला अभूतपूर्व गती आली होती. मात्र, ठाकरे सरकारने केवळ राजकारण आणि संकुचित वृत्तीपोटी त्यांची बदली केली. यामुळे आगामी काळात मुंबईचे मोठे नुकसान होईल."

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुन्हा भाजप आणि शिवसेना आमनेसामने खडे होणार असं दिसत आहे.

'उद्धवा अजब रे तुझे सरकार' मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून शिवसेनेला टोला

दरम्यान, मुंबई मेट्रोसाठी कारशेड तयार करण्यासाठी आरे कॉलोनी येथील कित्येक झाडे तोडण्यात आली होती, ज्याचा अनेक स्तरांवरून निषेध करण्यात आला. इतकंच काय तर अनेक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी या विरुद्ध रस्त्यावर उतरले होते. परंतु, अश्विनी भिडे यांनी मात्र आपली भूमिका जराही बदलली नाही. खुद्द आदित्य ठाकरे यांनी देखील अश्विनी भिडे यांच्या झाडे तोडण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी तेव्हा असेही म्हटले की आम्ही सत्तेत आलो की आरेतील झाडे तोडणाऱ्यांना बघून घेऊ.