Kharghar NMMT Bus Fire | (Photo Credit - Twitter)

नवी मुंबई (Navi Mumbai ) येथील खारघर सेक्टर 15 मधील घरकुल निवासी संकुलाजवळ एननवी मुंबई महानगरपालिका परिवहन (NMMT) प्रवासी बस आगीच्या भक्षस्थानी पडली. बसमध्ये सुमारे 15 पेक्षा अधिक प्रवासी होते. बसला अचानक आग लागल्याने परिसरात मोठाच गोंधळ पहायला मिळाला. महत्त्वाची बाब अशी की या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र परिसरात बराच काळ घबराट होती. खारघर रेल्वे स्टेशन (Kharghar Railway Station) परिसरात बुधवारी (6 सप्टेंबर) दुपारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपणही येथे हा व्हिडिओ पाहू शकता.

बसला आग लागल्याचे समजताच प्रवाशांना तातडीने आणि मोठ्या शथापीने बाहेर काढण्यात आले. स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला तातडीने दिली. अग्निशमन दलाच्या गाड्याही लवकरच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी बसची आग नियंत्रणात आणली. मात्र तोवर सर्व संपले होते. बस जळून खाक झाली होती.

खारघर अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी प्रसारमाध्यमांशी माहिती देताना सांगितले की, एनएमएमटी बस घरकुल निवासी संकुलाजवळील बस स्टॉपवर थांबल्यानंतर अचानक आग लागली. या वेळी प्रवासी बसमधून उतरत होते. बसच्या इंजिनच्या बोनेटमधील विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आगलागल्याचे निदर्शनास येताच बस कंडक्टरने प्रवाशांना सावध केले आणि ड्रायव्हरसह सर्वजण बसमधून ताबडतोब खाली उतरले.

ट्विट

अधिक माहिती अशी की, बसच्या कंडक्टरने बसमधील अग्निशामक यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग अधिक असल्याने त्याला ती नियंत्रणात आणता आली नाही. दरम्यान, अग्निशमन दलाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी आग वेगाने पसरली आणि संपूर्ण बसला वेढले. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.