जेजुरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
खंडोबा जेजुरी (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा दुप्पट वेगाने आली असून खबरदारीचा उपाय राज्यात कडक निर्बंधासह विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला. राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जेजुरीच्या (Jejuri) खंडोबाची होणारी सोमवती अमावस्या (Somavati Amavasya) यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 12 एप्रिल म्हणजेच उद्या होणार होती. मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी ग्रामस्थांनी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेजुरी खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार 12 एप्रिल रोजी जेजुरीच्या खंडोबाची सोमवती आमावस्या आली आहे. मात्र सूर्योदयानंतर दुसऱ्या प्रहरात अमावास्येला प्रारंभ आहोत असल्याने पालखी सोहळा निघणार नाही. ही यात्रा आणि पालखी दोन्ही रद्द करण्यात आल्या आहेत. या यात्रेसंबंधीचे सर्व धार्मिक विधी केले जातील. मात्र भाविकांना दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे भाविकांनी या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलय.हेदेखील वाचा- Solapur: घरात जितके शौचालय असतील तितक्याच कोविड रुग्णांना होम क्वारंटाईन राहता येईल, सोलापूर महापालिकेचा निर्णय

राज्यात कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणन नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात काल (10 एप्रिल) 55,411 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 57,638 वर पोहोचला आहे.

भारतामध्ये सर्वाधिक कोविड 19 लसीकरण हे महाराष्ट्र राज्यात झाले आहे. यामध्ये आता 1 कोटी 38 हजार 421 जणांना लस दिल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत (Mumbai) कोविड सेंटर्स (Covid Centers) उभारण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरु झालं असून कांजूरमार्ग, मालाड येथे रहेजा मैदानावर 2000 बेड्स पैकी 200 आयसीयू बेड्स असतील. सोमय्या ग्राऊंडवर 1000 पैकी 200 आयसीयू बेड्स असतील. महालक्ष्मी येथे 5300 बेड्स आणि 800 आयसीयू बेड्स तयार करण्यात येतील. येत्या 2-3 दिवसांत मुंबईकरांसाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल, असं सांगत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) नागरिकांना आश्वस्त केलं आहे. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.