Coronavirus | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक कोरोना रुग्ण होम क्वारंटाईन (Home Quarantine) होण्याचा पर्याय निवडत आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी कोविड सेंटर (COVID Centre) वा रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसल्याने प्रशासनाकडून होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र सोलापूरात यापुढे घरात जितके शौचालय असतील तितक्याच लोकांना क्वारंटाईन राहता येईल असा निर्णय सोलापूर महानगरपालिकेने (Solapur Municipal  Corporation) घेतला आहे.

सोलापुर महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या कोरोना रुग्णांकडे स्वतंत्र शौचालयाची सुविधा नाही अशांसाठी पालिकेतर्फे इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय ज्या नागरिकांना पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईनमध्ये रहायचे नाही त्यांच्यासाठी पेड क्वॉरन्टाईनची सुविधा देखील पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने 11 खासगी हॉटेल्सना परवानगी दिली आहे.हेदेखील वाचा- मुंबईत मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर्स उभारण्याचं काम सुरु; जीव वाचवणं हेच प्राधान्य- महापौर किशोरी पेडणेकर

पालिका हद्दीतील ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, मात्र कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. अशा सीसीसी केंद्रामध्ये 1200 लोकांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संस्थात्मक क्वारंटाईनसाठी 1300 लोकांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, अनेक नागरिक हे होम क्वॉरंटाईन होत असल्यामुळे त्या नागरिकांवर लक्ष देता येत नाहीये. त्यांच्या माध्यमातून कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांची मदत घेऊन संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनला घाबरुन जाऊ नये आणि तपासणीसाठी ही घाबरू नये. असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात काल (10 एप्रिल) 55,411 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 57,638 वर पोहोचला आहे.