KDMC: कल्याण डोंबिवली महापालिकेत 13 जणांचे नगरसेवक पद रद्द; पाहा प्रभागवार यादी
Kalyan Dombivli Municipal Corporation | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

कल्याण (Kalyan) डोंबिवली (Dombivali) महानगरपालिकेतील 13 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका ( Kalyan Dombivali Municipal Corporation) हद्दीतील 18 गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 गावे सोडून नगरपरिषद बनविणे आणि उर्वरीत 9 गावांसह कल्याण डोंबिवली महापालिका यांबाबत राज्य शासनाने अधिसूचना काढल्या आहेत. या अधिसूनांनंतर निवडणूक आयोगाने कामकाजाला सुरुवात केली आहे. ज्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्या नगरसेवकांची प्रभागनिहाय यादी आपण इथे पाहू शकता.

कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्या रचनेनुसार पालिका हद्दीत आता 18 प्रभाग राहणार आहेत. त्यामुळे पालिका हद्दीतून जी गावे अथवा प्रभाग वगळण्यात आले आहेत. त्या प्रभागांतील नगरसेवकांचे नगरसेवक पद पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी रद्दबादल ठरवले आहे. एकाच वेळी इतक्या संख्येने नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून कोणती गावे वगळली

घेसर, हेदूटणे, उंबोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाड, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे, अशी या गावांची नावे आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही गावे वगळली आहेत. ही अधिसूचना 24 जून रोजी काढण्यात आली होती. (हेही वाचा, आजदे, सागाव, नांदिवली, पंचानंद, धारिवली यासोबतच 'त्या' नऊ गावांसह पार पडणार केडीएमसी निवडणूक; राज्य सरकारची अधिसूचना जारी)

नगरसेवक पद रद्द झालेल्या नगरसेवकांची नावे (प्रभागांसह)

 1. प्रभाग क्रमांक 107 – नगरसेवक मोरेश्वर भोईर
 2. प्रभाग क्रमांक 86 – नगरसेविका सुनिता खंडागळे
 3. प्रभाग क्रमांक 109 – नगरसेवक रमाकांत पाटील
 4. प्रभाग क्रमांक 110 – नगरसेविका प्रमिला पाटील
 5. प्रभाग क्रमांक 116 – नगरसेविका दमयंती वझे
 6. प्रभाग क्रमांक 117 – नगरसेवक जालिंदर पाटील
 7. प्रभाग क्रमांक 118 – नगरसेविका इंदिरा तरे
 8. प्रभाग क्रमांक 119 – नगरसेविका विमल भोईर
 9. प्रभाग क्रमांक 120 – नगरसेविका शैलजा भोईर
 10. प्रभाग क्रमांक 122 – नगरसेवक प्रभाकर जाधव
 11. प्रभाग क्रमांक 108 – नगरसेवक कुणाल पाटील
 12. प्रभाग क्रमांक 105 – नगरसेविका सोनी अहिरे
 13. प्रभाग क्रमांक 106 -उर्मिला गोसावी

दरम्यान, या आधिच्या रचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 122 प्रभाग होते. यात 27 गावांचाही समावेश होता. या गावांमध्ये एकूण 21 प्रभाग होते. दरम्यान, या 27 पैकी 9 गावे पालिका हद्दीत आणि उर्वरीत 18 गावे वगळून त्यांची नगरपरिषद निर्मती करण्याचे ठरले. त्यानुसार राज्य सरकारने अधिसूचना काढल्या. नव्या अधिसूचनेनुसार 118 प्रभागाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. तसेच त्यानुसार प्रभाग रचनेचे कामही सुरु झाले आहे.