कौन बनेगा करोडपती (KBC) या शोमध्ये कोट्यवधी रुपये जिंकण्याची अनेकांची इच्छा असते, अगदीच काही नाही तर घर बसल्या प्रश्नांचे उत्तर देऊनही अनेक जण आपले नशीब आजमावतात. काही वेळेस या लोकांच्या उत्साहाचा फायदा घेऊन त्यांना खोटे कॉल केले जातात, या जाळ्यात अडकून लोकांना अक्षरशः लाखोंचा गंडा बसतो. हे टाळण्यासाठी दरवर्षी शो दरम्यान लोकांना खोट्या कॉलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले जाते पण शेवटी उत्साह आड येऊन फसवणुकीचे प्रकार घडतात. याचेच अगदी ताजे उदाहरण नालासोपारा (Nalasopara) येथे पाहायला मिळाले आहे. मनीषा झा (Manish Jha) नामक एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला देखील काही दिवसांपूर्वी लॉटरी जिंकल्याचा खोटा कॉल आला होता, यामध्ये अडकून या मुलाने एका फटक्यात 3 लाख रुपये गमावले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मनीष हा उत्तर प्रदेशचा रहिवाशी असून नालासोपारा येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता. 1 ऑगस्ट रोजी त्याला एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला होता. या फोनवरील माणसाने आपण केबीसीमधून बोलत असून तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे असे सांगितले.साहजिकच केबीसीचा चाहता असल्याने मनीष या कॉलमुळे खुश झाला, यानंतर लगेचच या कॉलरने मनीष याला तुम्हाला 20 हजार रुपये डिपॉझिट म्हणून भरावे लागतील असे सांगितले. यानुसार मनीषने 20 हजार रुपये भरले सुद्धा पण त्यांनतर पुन्हा एकदा त्याच क्रमांकावरून कॉल येऊन 2 लाख 80 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. इतकी मोठी रक्कम ऐकून मनीषच्या कुटुंबाने सुद्धा संशय घेतला पण आपल्या उत्साहाने मनीषने आईला पैसे भरण्यास तयार केले.
हा सर्व प्रकार घडल्यावर पुढील एक महिना मनीषला लॉटरी संदर्भात काहीच अपडेट मिळत नव्हते म्ह्णूनच एक दिवस काळजीने मनीषने ज्या नंबरवरून कॉल आला त्यावर पुन्हा कॉल करून पहिले मात्र यावेळी फोन बंद असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, हे कॉल उत्तर प्रदेशातुनच आले असल्याचा अंदाज आहे. सध्या जय अकाउंट मध्ये मनीषने ३ लाख रुपये जमा केले त्या माध्यमातून लुटारूंचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
टीप- केबीसी किंवा अन्य कोणत्याही नावाने तुम्हालाही अशा प्रकारचा कॉल आल्यास यामध्ये न अडकता थेट सायबर पोलिसांची मदत घ्यावी. साधारणतः कोणतेही रिऍलिटी शो सहभागासाठी शुल्क आकारत नाहीत त्यामुळे बहुतांश वेळा हे फसवे कॉल असू शकतात.