Karachi Bakery (Photo Credits: Twitter)

मुंबईतील (Mumbai) कराची बेकरी (Karachi Bakery) काही  दिवसांपासून बंद झाली. मनसेच्या (MNS) मागणीमुळे बेकरी बंद करण्याचा निर्णय घेण्याता आल्याचा दावा मनसेने केला होता. दरम्यान, नाव न बदलता कराची बेकरी मुंबईत पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती कराची बेकरीचे एक मालक राजेश रामनानी यांनी द प्रिंटशी बोलताना दिली आहे. रामनानी यांनी सांगितले की, "वांद्रे येथील जागेचा भाडेकरार संपल्यामुळे आम्ही तिथलं आऊटलेट बंद केलं. आम्ही दुसऱ्या जागेच्या शोधात आहोत. आम्हाला जागा मिळताच आम्ही बेकरी पुन्हा सुरु करु." तसंच आम्ही आमच्या ब्रँडचं नाव बदलण्याचा कधीच विचार करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, "ब्रँडच्या नावावरुन वाद सुरु झाल्याचं आम्हाला दु:ख आहे. आमचं या ब्रँडशी भावनिक नातं आहे. त्यामुळे ब्रँडचं नाव बदलण्याचा आम्ही विचार करणार नाही. भाडेकरार संपल्यामुळे आणि व्यवसाय कमी झाल्यामुळे दुकान बंद केलं आहे. मात्र दुसरी जागा मिळताच पुन्हा बेकरी सुरु करु."

Karachi Bakery Tweet:

दरम्यान, मनसे उपाध्यक्ष हाजी सेफ शेख यांनी मनसेच्या नाव बदलण्याच्या मागणीनंतर महिन्याभरातच बेकरी बंद झाल्याचे ट्विटद्वारे सांगितले होते. त्यानंतर बेकरीचे मॅनेजर रामेश्वर वाघमारे यांनी भाडेकरार संपल्यामुळे आणि कोविड-19 संकटात मंदावलेला व्यवसाय यामुळे बेकरी बंद करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर Mumbai North Central District Forum ने देखील ट्विट करत नावातील बदलामुळे बेकरी बंद होत असल्याची माहिती चुकीची असल्याचे म्हटले होते.

पाकिस्तानातील कराची येथून स्थलांतरीत झालेल्या खानचंद रामनानी यांनी 1953 मध्ये कराची बेकरीची हैद्राबादमध्ये सुरुवात करण्यात केली. त्यानंतर हा व्यवसाय विस्तार गेला. आता दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये बेकरीच्या एकूण 20 शाखा आहेत.