
वांद्रे (Bandra) येथील प्रसिद्ध कराची बेकरी (Karachi Bakery) बंद करण्यात आली आहे. कराची बेकरीचे पाकिस्तानी नाव बदलण्याची मागणी मनसे (MNS) ने केली होती. त्यानंतर ही बेकरी बंद करण्यात आल्याचे मनसे उपाध्यक्ष हाजी सेफ शेख (Haji Saif Shaikh) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र मनसेकडून करण्यात आलेल्या नावाच्या बदलातील मागणी हे बेकरी बंद होण्याचे कारण नसल्याचे कराची बेकरीच्या मॅनेजरने स्पष्ट केले आहे.
बुधवारी मनसेचे उपाध्यक्ष हाजी सेफ शेख यांनी ट्विटद्वारे कराची बेकरी बंद झाल्याची माहिती दिली. कराची बेकरीच्या 'कराची' या नावावर केलेल्या आंदोलनानंतर मुंबईतील कराची बेकरीची एकमेव शाखा बंद झाली आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु, ही माहिती चुकीचे असल्याचे बेकरीचे मॅनेजर रामेश्वर वाघमारे यांनी म्हटले आहे. बेकरी बंद करण्याचा निर्णय हा बेकरीच्या नावातील बदलाच्या निर्देशनामुळे घेतलेला नाही तर बेकरी सध्या स्थित असलेल्या जागेचा भाडेकरार संपला असून जागेच्या मालकाने अधिक भाडेवाढ केल्याने आम्ही बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, Mumbai North Central District Forum ने देखील ट्विट करत नावातील बदलामुळे बेकरी बंद होत असल्याची माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे.
पहा ट्विट:
False spreading of information!
The Karachi Bakery has shut its store due to lack of business and not because of @mnshajisaif , nothing more then an failed attempt to mislead citizens.
Please note ! https://t.co/xkLtAGIAR0
— M.N.C.D.F (@MNCDFbombay) March 3, 2021
"कोविड-19 लॉकडाऊनमुळे ग्राहकांच्या संख्येत खूप मोठी घट झाली. त्याचा परिणाम बेकरीच्या व्यवसायावर झाला. त्यानंतर काही महिन्यापर्यंत आम्ही तग धरला. परंतु, आता भाडेवाढ झाल्यामुळे आम्ही बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे," असे वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान, या बेकरीच्या जागेवर एक आईस्क्रीम पार्लर सुरु झाले आहे. (मुंबईमधील 'Karachi Sweets' चे नाव बदलण्याची मागणी निरर्थक, ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही- Sanjay Raut)
पाकिस्तानातील कराची येथून स्थलांतरीत झालेल्या सिंधी लोकांकडून या बेकरीची हैद्राबादमध्ये सुरुवात करण्यात आली होती. याचीच शाखा मुंबईत होती.