कल्याण जवळील पत्री पूलाचे काम पूर्ण; 25 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
Kalyan Patri Bridge (Photo Credits: Facebbok)

कल्याण (Kalyan) पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या पत्रीपुलाचे (Patri Bridge) काम पूर्ण झाले असून 25 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी (22 जानेवारी) ठेकेदाराने पुलाचे काम पूर्ण झाल्याचा अहवाल अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. दरम्यान, या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

रस्ते विकास महामंडळाने 110 मीटर लांबीचा पत्रीपूल तयार केला असून यासाठी तब्बल 26 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 18 नोव्हेंबर 2018 रोजी रेल्वेने या ब्रिटिशकालीन पुलाचे काम सुरु केले. त्यानंतर तब्बल 26 महिन्यांनी पूलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दरम्यान, कोरोना लॉकडाऊन, पुलाची लांबी निश्चित करण्यासाठी झालेली दिरंगाई यात काही वेळ वाया गेला. मात्र मे 2020 पासून पुन्हा एकदा पुलाचे काम सुरु करण्यात आले.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पुलाची पाहणी केली. तसंच यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतुककोंडीची समस्या सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्रीकांत शिंदे ट्विट:

नोव्हेंबर 2020 पासून पुलाच्या कामाला वेग आला. त्यानंतर दोन महिन्यांत काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्याप्रमाणे 22 जानेवारी रोजी पूल रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला. 25 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर पूल प्रवासासाठी खुला होईल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या वाट्याला येणारी वाहतुक कोंडी टळेल. दरम्यान, यापूर्वी पुलाच्या बांधकामामुळे रेल्वे मार्गावर अनेकदा पावर ब्लॉक्स घेण्यात आले होते.