(File Image)

Jalna, Crime News: महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. ज्याचे संपूर्ण नाव महाराष्ट्र नरबळी (Human Sacrifice) व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 असे आहे. हा कायदा असताना आणि अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे यासाठी वेळोवेळी जनजागृती करुनही धक्कादायक घटना राज्यात उघडकीस येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना जालना (Jalna Crime News) जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यताली धामणगाव येथून पुढे येत आहे. केवळ गुप्तधनाच्या (Hidden Wealth) नावाखाली नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये एका भोंदू बाबास (Bhondu Baba) पोलिसांनी अटक केली आहे.

भोंदू बाबाच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या?

गणेश लोखंडे (रा. धामणगाव) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. ज्याला जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने केलेल्या मानसिक छळामुळे कथीतरित्या ज्ञानेश्वर भिका आहेर (वय 30, रा. वालसा वडाळा) नावाच्या व्यक्तीने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये आगोदरच तक्रार आणि गुन्हा दाखल होता. त्याचा तपास सुरु असतानाच पोलिसांनी गणेश लोखंडे नामक भोंदू बाबस अटक केली होती. त्यास भोकरदन न्यायालयाने 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीदरम्यान झालेल्या चौकशीत बाबाने अतिशय धक्कादायक खुलासे केले. ज्यामुळे पोलिस आणि स्थानिक गावकरीही चक्रावून गेले आहेत.(हेही वाचा, Amravati Bhondu Baba Treatment: भोंदू बाबाचा अघोरी उपचार, 22 दिवसांच्या बाळाला विळा तपावून चटके; Chikhaldara येथील घटना)

गणेश लोखंडे नामक भोंदू बाबाने पोलिसांना सांगितले की, मला गुप्तधन शोधायचे होते. हे गुप्तधन बाहेर काढण्यासाठी मला एका पायाळू मुलीचा नरबळी द्यायचा होता. तिचा मी शोध घेत होतो. हा शोध घेत असतानाच मी माझ्या घरात इलेक्ट्रिक ब्रेकरच्या साह्याने खड्डा खणत होतो. दरम्यान, मला आहेर याच्या मुलीबाबत कळले. त्यामुळे मी सातत्याने त्याच्या संपर्कात होतो. त्याच्या मुलीचा नरबळी देऊनच मी गुप्तधन बाहेर काढणार होतो, अशी कबुलीच या बाबाने दिली. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असता, घटनास्थळावरुन इलेक्ट्रिक ब्रेकरच्या, एक पुस्तक आणि इतर काही साहित्य जप्त केले. धक्कादायक म्हणजे त्याच्या घरात इलेक्ट्रिक ब्रेकरच्या साह्याने खोदलेला एक मोठा खड्डाही आढळून आला. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करुन पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, ही घटना पुढे येताच धामणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस तपासात आणखी काही तपशील पुढे येण्याची शक्यता आहे. भोंदू बुवा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.