
महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा (Anti-Superstition and Black Magic Act) अस्तित्वात असला आणि आपण कितीही विज्ञानवादाच्या गप्पा मारल्या तरी, भोंदू बाबा (Bhondu Baba), बुवा आणि गंडे दोरे, अघोरी उपचार, काळी जादू, अंधश्रद्धा यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. नागरिकांमध्ये जाणीव जागृती आल्याचा कितीही दावा केला जात असला तरी, अद्यापही लोक अशा बुवा, बाबांच्या कच्छपी लागतात. अशीच घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चिखलदरा (Chikhaldara) तालुक्यातील सिमोरी गावात घडली आहे. श्वस घेण्यास त्रास होत असलेल्या अवघ्या 22 दिवसांच्या बाळास एका भोंदू बाबाने चक्क लोखंडी विळा तापवून त्याचे चटके दिले आहेत. धक्कादायक म्हणजे एकदोन नव्हे तर या बाळास तब्बल 65 वेळा चटके देण्यात आले आहेत. वेदनेने कळवळणाऱ्या या जीवाकडे पाहून या बाबाचे हृदय तसूभरही द्रावले नाही. सर्वात आश्चर्याची बाब अशी की, या बाळाचे पालकच या बाळाला या बाबाकडे घेऊन गेले होते.
काय आहे प्रकरण?
जन्मास येऊन केवळ 22 दिवसच झालेल्या या बाळास श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे या बाळाच्या कुटुंबीयांनी त्यास गावातीलच एका बाबाकडे नेले. हा बाबा भोंदू होता. त्याने कोणताही विचार न करता बाळावर अघोरी उपचार केले. ज्यामध्ये त्याने लोखंडी विळा तापवला आणि त्याच तापत्या विळ्याचे या बाळाच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 65 चटके दिले. लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, या चटक्यांनी या कोवळ्या जीवाची प्रकृती अधिकच बिघडली. घडला प्रकार बाळाच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी या बाळास सिमोरी गावाजवळील हातरु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. पण बाळाची प्रकृती इतकी गंभीर आहे की, प्राथमिक उपचार केल्यानंतर बाळास अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळावस सध्या वैद्यकीय फ्चार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, डॉक्टरांनीही बाळास गरम वस्तूचे चटके दिल्याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा, Nagpur: संतापजनक! भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील चौघींवर लैंगिक अत्याचार; भोंदूबाबा अटकेत)
डंभा देऊन उपचार
दरम्यान, चिखलदरा हे आदिवासी बहुल भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक आदिवासी पाडे असून अद्यापही या समूहामध्ये पारंपरिक उपचारपद्धती राबवल्या जातात. शिक्षण आणि प्रबोधन आवश्यक प्रमाणात न झाल्याने बुवा, बाबा आणि अघोरी उपचार यांवर विश्वास ठेवला जातो. या परिसरातील अनेक ठिकाणी अशा पद्धतीनेच चुकीचे उपचार केले जातात. स्थानिक पातळीवर याला डाग किंवा डंभा असे म्हटले जाते. लहान मुले ते ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांवरही अशा पद्धतीने अनेकदा उपचार केले जातात. दरम्यान, राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे अधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते सांगतात.