Jalgaon Municipal Corporation | (File Photo)

जळगाव महापालिका (Jalgaon Municipal Corporation) महासभाेत आज (15 डिसेंबर) आज तुफान राडा पाहायला मिळाला. जवळपास दीड वर्षांनंत प्रथमच जळगाव महापालिकेची महासभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभेच्या सुरुवातीपासूनच वादाला सुरुवाला झाली. शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) नगरसेवक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमहापौर कुलभूषण पाटील व ज्येष्ठ नगरसेवक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. उपस्थितांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला. दरम्यान, सभेच्या शेवटी राष्ट्रगीत सुरु होत होते. इतक्यात एका प्रस्तावाच्या मतदानात उपमहापौरांकडून खाडाखोड झाल्याचा आरोप भाजप नगरसेवक कैलास सोनावणे यांनी केला. या वेळी उपमहापौर आणि नगरसेवक सोनावने यांच्यात पुन्हा एकदा वादावादी झाली. यावेळी उपमहापौर पाटील यांना धक्काबुक्की झाल्याने ते खुर्चीवर पडले. त्यानंतर सभागृहात चांगलीच धावपळ उडाली.

महासभा सुरु होताच महापालिकेतील विकासकामांना मंजुरी देण्याची चर्चा सुरु होणे अपेक्षीत होते. किंबहुना तसा संकेतही आहे. मात्र तसे न होता सदस्यांनी थेट हमरीतुमरीवरच येणे पसंत केले. त्यात उपमहापौर कुलभूषण पाटील व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात झालेली हमरीतुमरी अधिक चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या या मंडळींनी भाषेचा केलेला वापर इतका दर्जाहीन होता की उपस्थितांनाही ओशाळल्यासारखे झाले. ' 'तोडपाणी करण्यासाठी उपमहापौर व्यासपीठावर बसले आहेत का? तू तुझे हे छपरी धंदे बंद कर !' अशा शब्दांमध्ये एकमेकांशी संवाद झाला. (हेही वाचा, Jalgaon: बंडखोर भाजप नगरसेवकांना अपात्रेच्या नोटीसा; राजकीय वर्तुळात कारवाईबाबत उत्सुकता)

दरम्यान, सभेच्या शेवटच्या कालावधीत प्रामुख्याने शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला. यात प्रभाग क्रमांक 10 मध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 5 कोटी रुपयांच्या निधीमधील कामांना कार्यादेश देण्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या निधीत आणखी 4 कोटी रुपये निधी वाढवावा व ही कामे पूर्ण करावीत अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. मात्र, तसे केल्या अधिक वेळ जाईल असे कारण देत शिवसेनेने आगोदरचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली. त्यामुळे या प्रस्तावावर मतदान झाले. दोन्ही बाजूंनी 26-26 अशी मते मिळाल्याचे सांगण्यात आले. यावरुन गोंधळ सुरु झाला. इतक्यात महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केले आणि राष्ट्रगीत सुरु करण्याची घोषणा केली. त्यामुळे वाद आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे.