भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी देशभरातील प्रादेशिक पक्षांबाबात एक स्फोटक विधान केले आहे. या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे. नड्डा (J.P. Nadda) यांनी भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाबद्दलही मोठे विधान केले आहे. देशभरातील प्रादेशिक पक्ष संपून जातील. परिवारवादी पक्षही संपून जातील. केवळ भाजपच (BJP) उरेल, असे विधान नड्डा यांनी केले आहे. महाराष्ट्रातही केवळ भाजपच राहिल. शिवसेना पक्षही संपत आहे, असे विधान नड्डा यांनी केले आहे. नड्डा यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
बिहारमधील विविध जिल्ह्यांमधील प्रादेशिक कार्यालयांचे उद्घाटन अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते जाहीर कार्यक्रमात बोलत होते. नड्डा यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, भाजप ही एक विचारधारा प्रमाण मानणारी पार्टी आहे. या पार्टीला जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे देशात केवळ भाजपच राहणार. आज भाजपसोबत दोन हात करण्याची क्षमता देशात कोणत्याच पक्षात राहिली नाही. त्यामुळे देशातील प्रादेशिक पक्ष संपण्याच्या वाटेवर आहेत. पण, राष्ट्रीय पातळीवरही भाजपसोबत दोन हात करण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष राहिला नसल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय पक्षांच्या बाबतीत त्यांचा रोख हा काँग्रेसकडे होता. (हेही वाचा, Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra: शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची 'शिव संवाद' यात्रा, दुसरा टप्पा आजपासून सुरु; जाणून घ्या वेळापत्रक)
भविष्यात काँग्रेस 40 वर्षांनंतरही भाजपला टक्कर देऊ शकणार नाही. भाजपची विचारधारा लोकांना आवडते आहे. काँग्रेसमध्ये जे लोक 20 वर्षांपेक्षाही अधिक काळ राहिले आहेत ते लोकही काँग्रेस सोडून भाजपचा हात धरत आहेत. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसही खिळखीळी होईल, असे संकेत नड्डा यांनी अप्रत्यक्ष रित्या दिले.
व्हिडिओ
देशातून काँग्रेस संपत आहे. तर प्रादेशिक स्तरावरुन स्थानिक पक्षही संपत आहेत. विविध राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या ओहोटीवरुन हे लक्षात येत असल्याचेही नड्डा म्हणाले. विविध राज्यांमध्ये परिवारवादी प्रादेशिक पक्ष आहेत. यात उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, बिहारमध्ये जनता दल, ओडिसामध्ये नवीन पटनाईक हे सगळे एका व्यक्तीचे किंवा परिवाराचे पक्ष आहेत. महाराष्ट्रातही आता शिवसेना हा प्रादेशिक पक्ष संपत आहे. त्या पक्षातही घराणेशाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा देखील कुटुंबाचा पक्ष आहे. काँग्रेसही राष्ट्रीय पातळीवरील बहिण भावांचा पक्ष झाला असल्याचे नड्डा म्हणाले. त्यामुळे नड्डा यांच्या वक्तव्यावर इतर पक्ष काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.