Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केली. हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे जिल्ह्यातील रस्ते गुळगुळीत झाले नाहीत, तर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे मंत्र्यांनी म्हटले होते. मात्र नंतर वाद वाढल्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून झालेल्या राजकीय गदारोळात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्र्यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत म्हणाले की, ‘अशा तुलना यापूर्वीही झाल्या आहेत. हेमा मालिनी यांच्याबद्दलचा हा आदर आहे. त्यामुळे त्याकडे नकारात्मक नजरेने पाहू नका. यापूर्वी लालू यादव यांनीही असेच उदाहरण दिले होते. आम्ही हेमा मालिनी यांचा आदर करतो.’ मंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील यांनी शनिवारी (11 डिसेंबर 2021) उत्तर महाराष्ट्रातील त्यांच्या जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीसाठी आयोजित निवडणूक बैठकीला हजेरी लावली. त्यादरम्यान त्यांनी ही आक्षेपार्ह टिप्पणी केली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत मंत्र्यांना जाहीर माफी मागण्यास सांगितले होते. यासोबतच कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे भाजप खासदार हेमा मालिनी यांनी उद्धव सरकारच्या मंत्र्याच्या वक्तव्याला फारसे महत्त्व दिले नाही. त्या म्हणाल्या की, याची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी लालू यादव यांनी केली होती परंतु अशा कमेंट करू नका. त्यांची मंत्र्यांकडून माफीचीही अपेक्षा नाही. (हेही वाचा: महिलांचा अपमान करणारे पाटलांसारखे मंत्री हे कलंक आहेत, त्यांना वाचवणारेही कलंकित झालेत - चित्रा वाघ)

दरम्यान, गेल्या महिन्यात नोव्हेंबर 2021 मध्ये राजस्थान सरकारचे ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र सिंह गुडा म्हणाले होते की, हेमा मालिनी आता म्हाताऱ्या झाल्या आहेत, त्यामुळे कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते बनवले पाहिजेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मुख्य अभियंत्यांना सांगितले की आमच्या गावातील रस्ते अगदी कतरिना कैफच्या गालासारखे बनवा.