इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरण: व्यावसायिक सुधाकर शेट्टीच्या घरावर ईडीचे छापे
Enforcement Directorate (ED) PC - Wikipedia)

सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) (ईडी) वादग्रस्त व्यावसायिक सुधाकर शेट्टी (Businessman Sudhakar Shetty) यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापे मारले आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ईडीने ही कारवाई केली. इक्बाल मिर्ची मनी लाँड्रिंग प्रकरणी (Iqbal Mirchi Case) ईडीने हा छापा घातला असल्याची माहिती समोर आली आहे. सुधाकर शेट्टी हे बांधकाम व्यावसायिक असून मुंबईत काही ठिकाणी त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी एक मराठी वृत्तवाहिनीदेखील सुरू केली होती. परंतु, काही महिन्यांआधी त्यांनी या वाहिनीची अर्धी मालकी विकली होती.

ईडीने गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईमध्ये महत्वपुर्ण दस्ताऐवज जप्त केले आहेत. दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार व मुंबई बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी इक्बाल मिर्चीचे 2013 मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या नावाची मालमत्ता विक्रीत अनेक बडी मंडळी सहभागी आहेत. (हेही वाचा - इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणात शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांची होणार चौकशी; ED ने पाठवली नोटीस)

ईडीने सोमवारी याप्रकरणी डीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली. वाधवान यांच्यावर इक्बाल मिर्चीशी संबंधित बनावट कंपन्यांना 2100 कोटींचे कर्ज दिल्याच्या आरोप आहे. वाधवान यांच्या 'डीएचएफएल'ने मिर्चीच्या मदतीने 2100 कोटी रुपयांच्या कर्जाद्वारे बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे यासंबंधी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडी त्याचा तपास करीत आहे. वाधवान यांच्या अटकेनंतर ईडीने सुधाकर शेट्टी यांच्या घरावर व कार्यालयावर छापे मारले आहेत. आतापर्यंत या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे .