Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

ऑनलाईन गेमचा नाद अल्पवयीन आणि तरुणांमध्ये इतका भयावह पद्धतीने वाढतो आहे की, त्याचे रुपांतर व्यसनात (Internet Gaming Addiction) होऊन बसले आहे. या व्यसनातून उस्मानाबद (Osmanabad) येथील एका अल्पवयीन मुलाने एका चिमूकल्याची गळा आवळून हत्या (Murder) केली आहे. उस्मानाबद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी (Sangvi Mard) येथे ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. अल्पवयीन आरोपीने ऑनलाईन गेममध्ये पैसे हारल्याने पैशाच्या मोहापाई हे कृत्य केल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे आरोपीने अल्पवयीन मुलाची हत्या करण्यासाठी 'क्राईम पेट्रोल' ही मालिका रात्रभर पाहिली. त्यानंतर त्याने हे कृत्य केले.

सांगवी मार्डी येथील पाच वर्षाचा एक लहान मुलगा त्याच्या राहत्या घरातून दुपारी एक वाजणेच्या सुमारास अचानक गायब झाला होता. दुकानातून खाऊ आणण्याच्या निमित्ताने बाहेर पडलेला हा मुलगा घरी परतलाच नाही. घरातील लोकांनी बराच काळ वाट पाहूनही तो परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता घराजवळीलच एका पडक्या इमारतीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्या मुलाच्या कानातील सोन्याची कुंटलेही गायब होती. अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. मुलाची एकूण स्थिती पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले. (हेही वाचा, MP Suicide Case: मध्य प्रदेशात ऑनलाईन फसवणूक झाल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या)

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच वस्तुस्थितीजन्य पुराव्यांवरुन तपास सुरु केला. पोलिसांनी संशयावरुन घराशेजारील एक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या आई-वडीलांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. पोलिसांनी सखोल चौकशीनंतर शेजारच्या या अल्पवयीन मुलाने माहिती दिली. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने त्याची भरपाई करायची होती. घरी पैसे मागितले तर वडीलांचा मार मिळाला असता. त्यामुळे या मुलाचे लक्ष चिमुकल्याच्या कानात असलेल्या सोन्याच्या कुंडलांवर गेली. त्याने लेसने मुलाचा गळा आवळला आणि त्याची कुंडले लांबवली. ही हत्या करण्यासाठी आपण 'क्राईम पेट्रोल' मालिका पाहिल्याचेही या मुलाने पोलिसांना सांगितले. या मुलाचे वडील सैन्यात मेजर आहेत.