Indo-Australia Drug Syndicate | (Photo Credits: ANI/X)

मुंबईतील नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (NCB) ने फार्मास्युटिकल ड्रग्सच्या अवैध तस्करीमध्ये गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट फार्मास्युटिकल ड्रग्स भारतातून ऑस्ट्रेलियाला पोहोचवत होते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत तब्बल 9.877 किलोग्रॅम अॅम्फेटामाइन (Amphetamine), 2.548 किलोग्रॅम झोलपीडेम टारट्रेट (Zolpidem Tartrate) (9800 गोळ्या) आणि 6.545 किलोग्राम ट्रामाडॉल (18700 गोळ्या) जप्त केले. ज्याची बाजारातील किंमत 3 कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी कारवाईत भारत-ऑस्ट्रेलिया ड्रग सिंडिकेटच्या तीन सदस्यांनाही अटक केली.

 इंटेलिजन्स इनपुटच्या आधारे कारवाई

ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय तस्करीत एक आंतरराष्ट्रीय सिंडिकेट गुंतल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार इंटेलिजन्स इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कुरिअरद्वारे एक माल ऑस्ट्रेलियाला पाठवला जात असल्याचे तपासात आढळून आले. अधिकार्‍यांनी पार्सल ओळखले आणि एका खाजगी कुरिअर सुविधेवर पाळत ठेऊन तपास केला. अधिका-यांनी तपासास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला स्टील टेबल फर्निचरचे संशयास्पद बॉक्स आढळले. पोलिसांनी अधिक तपास केला असता पुढील टेबलमध्ये खास डिझाइन केलेले कप्पे चोरकप्पे आढळून आले. (हेही वाचा, Excise Department Seizes Smuggling Liquor: सोलापूर गोदामावर उत्पादन शुल्क विभागाचे छापे, 80 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त)

फर्नीचरच्या कप्प्यात पांढऱ्या रंगाची भुकटी

अधिक तपासात पुढे आले की, फर्नीचरच्या कप्प्यांमध्ये एक पांढऱ्या रंगाची भुकटी असलेला पदार्थ आढलला. जो पुढील तपासणीत तो अॅम्फेटामाइन असल्याची पुष्टी झाली. या सर्व प्रकरणात व्ही सिंग नावाचा एक आरोपी गुंतल्याची माहिती पुढे आली. त्याला 19 डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडे केलेल्या सखोल आणि अधिकच्या चौकशीत रॅकेटची अधिक माहिती मिळाली. त्याचे दोन सहकारी, जी मिश्रा आणि पी शर्मा यांना बुधवारी अटक करण्यात आली.

एक्स पोस्ट

आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर अवैध ड्रग्ज

या सर्व आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर अवैध ड्रग्ज सापडले. हे सर्वजण हे ड्रग्ज विदेशात, प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात पाठविण्याच्या तयारीत होते. अधिका-यांनी सांगितले की आरोपींना आंतरराष्ट्रीय पार्सल यंत्रणेच्या कामकाजाची चांगली माहिती होती आणि यापूर्वी देखील ते अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील होते. हा सिंडिकेट गेल्या 2-3 वर्षांपासून या व्यवसायात असून कागदपत्रांचा गैरवापर करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ही भारतातील कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था आहे. ही संस्था केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येते. अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात लढा देण्यासाठी ही संस्था काम करते. NCB नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत काम करते. आतापर्यंत या संस्थेने विविध कारवाया करुन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट्स, सिंडिकेट उदध्वस्त केली आहेत.