India-China Clash: भारत-चीन सीमेवर जवानांची बलिदाने थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे- शिवसेना
The India-China Face-Off in Ladakh (Photo Credits: ANI)

चीनबरोबर जो संघर्ष (India-China Clash:) आज सुरु आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरु ( Pandit Jawaharlal Nehru) यांच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणा आहे असे जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरु आहेत ती थांबविण्याची जबाबदरी मोदी सरकारचीच आहे. 'गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो', असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहे. त्यामुळे आज जे घडले त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Daily Saamana) संपादकीयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करुन देण्यात आली आहे.

चीनचा हल्ला! या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादला येऊन पंतप्रधान मोदींच्या झोपाळ्यावर ढोकळा खात बसले तेव्हाही याच स्थंबातून आम्ही इशारा दिलाच होता. चीनवर विश्वास ठेऊ नका. पंडित नेहरु यांचा विश्वासघात झाला तसा तुमचाही होईल. दुर्दैवाने तो झाला आहे.

पाकिस्तानला धमक्या देणे आणि सर्जिकल स्ट्राइक करुन राजकीय माहोल बनवणे सोपे आहे. कारण पाकिस्तान हा देश नसून टोळी आहे. पण चीनचे तसे नाही. अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणाऱ्या चीनची स्वत:ची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने हिंदुस्थानवर आधीच अतिक्रमण केले आहे. लढाकच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे.दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरु आहेत. तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही, पण 20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामळे धक्का बसेल, असा इशाराही दै. सामना संपादकीयातून देण्यात आला आहे. (हेही वाचा, India-China Relations: चीनचे राष्ट्रपती मोदींच्या गावात झोपाळा हलवून गेले पण..: शिवसेना)

दरम्यान, मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला असे दावे सहा वर्षात अनेकदा झाले. पण या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने हिंदुस्थानवर सरळ हल्ला केला आहे. हिंदुस्थानच्या सीमेवर एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले आहेत याचे आश्चर्य वाटते. नेपाळने हिंदुस्थानचा नकाशा कुरतडला आहे. पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राइकनंतरही कायम आहे. चीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे पण नेपाळही हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहात असेल, आव्हानाची भआषा करीत असेल तर जगाचा नेता, महासत्ता वैगेरे होऊ पाहणाऱ्या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल, असेही सामना संपादकीयात म्हटले आहे.