Mumbai Police (Photo Credits: PTI)

'अग्निपथ' योजनेच्या (Agnipath Scheme) विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. सरकारच्या (Central Govt) या निर्णयामुळे संतप्त होऊन देशातील तरुण बिहार ते उत्तर प्रदेश (UP), उत्तराखंड (Uttarakhand), हरियाणा (Haryana), दिल्ली (Delhi), राजस्थानसह (Rajasthan) अनेक राज्यांमध्ये आंदोलन करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) आणि इतर जिल्ह्यात अग्निपथ योजनेसंदर्भात गाड्यांमध्ये तोडफोड आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अनेक इनपुटवरून रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली आहे. याची माहिती मिळताच सर्व रेल्वे पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या इनपुटनंतर रेल्वे यार्डची सुरक्षा वाढवण्यात आली असून आरपीएफला कडक बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांतील गाड्यांना लक्ष्य करू शकतात. कारण इथे रेल्वेची बरीच मालमत्ता आहे.

राज्यातील रेल्वे स्थानकांची वाढवण्यात आली सुरक्षा

दरम्यान, प्रशासनाकडूनही कडक कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील कोचिंग सेंटर्स आणि सोशल मीडियावर कडक नजर ठेवण्यात आली आहे. या इनपुट अलर्टच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांना राखीव पोलिसांची एक कंपनी देण्यात आली होती. रेल्वे पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण MMR विभागातील स्थानकांना देखील लक्ष्य केले जाऊ शकते. सध्या महाराष्ट्रातील या भागातील स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

या योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने आहे सुरू

एकीकडे या योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत, तर दुसरीकडे अग्निपथ योजनेबाबत तिन्ही सेनांच्या वतीने 19 जून रोजी सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये या योजनेचे फायदे सांगण्यात आले. डिसेंबरमध्ये 25 हजार अग्निवीरांची पहिली तुकडी लष्करात दाखल होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. (हे देखील वाचा: Agnipath Scheme: सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांचा 'अग्निपथ' योजनेला पांठिबा, म्हणाले - तरुणांना रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध)

वायुदलाची पहिली तुकडी डिसेंबर माहिन्यात होणार दाखल

एअर मार्शल झा म्हणाले की, पाच दिवसांनंतर म्हणजेच 24 जून रोजी हवाई दलात अग्निवीरांच्या भरतीची अधिसूचना जारी केली जाईल. यानंतर बरोबर एक महिन्यानंतर म्हणजेच 24 जुलै रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. एअर मार्शल झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबर महिन्यात वायु दलात दाखल होईल आणि अग्निवीरांचे प्रशिक्षणही 30 डिसेंबरपासून सुरू होईल.