Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

गेल्या 48 तासांत महाराष्ट्र पोलिस दलातील (Maharashtra Police Force) एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून 150 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या 4666 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत 57 कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

भारतात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोना विरोधातील लढाईत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात राज्यातील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार आदींचा समावेश आहे. यातील अनेकांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - मुंबईतील स्थानिकांनी घरापासून 2 किमी पेक्षा अधिक अंतरावर जाण्याचे टाळावे, मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन)

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये शनिवारी सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. शनिवारी राज्यात 5,318 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली. तसेच शुक्रवारी राज्यात सर्वाधिक 5,024 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,59,133 इतकी झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळून आले आहेत.