मुंबईतील स्थानिकांनी घरापासून 2 किमी पेक्षा अधिक अंतरावर जाण्याचे टाळावे, मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
Coronavirus in India | representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु राज्यात आता अनलॉकची सुरुवात झाली असून नियम शिथील करत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी रविवारी शहरातील रहिवाशांना व्यायामासाठी किंवा दुकाने आणि सलूनमध्ये जाण्याच्या उद्देशाने दोन किमीच्या घराच्या पलीकडे जाऊ नये असे आवाहन केले आहे. ऑफिस आणि वैद्यकिय कामांकरिता नागरिकांना 2 किमी पेक्षा अधिक अंतरावर जाण्यास परवानगी दिली जाईल असे एका वरिष्ठ पोलिसांनी म्हटले आहे. मात्र 2 किमी बाहेरील क्षेत्रात शॉपिंगसाठी पूर्णपणे बंदी असणार आहे.

मुंबई पोलिसांनी सोशल डिस्टंन्सिंगसह स्वत:ची सुद्धा काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिकांना केले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे असे ही सांगण्यात आले आहे. घराबाहेर पडताना नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य आहे.(Uddhav Thackeray Live Updates: 30 जून नंतर महाराष्ट्रात काय होणार? पहा उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह मधील महत्वाचे मुद्दे)

मिशन बिगीन अगेन नुसार आता महाराष्ट्र सरकारने काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोना व्हायरसचा धोका अद्याप कायम असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. परंतु काही जणांकडून या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांमुळे अन्य जणांना सुद्धा याचा त्रास होत आहे. याच कारणास्तव सर्व नागरिकांना लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सुचनांचे कठोरपणे पालन करावे असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.(महाराष्ट्र: मुंबईत केशकर्तनालये आणि सलून आजपासून सुरु; 'ह्या' नियमांचे करावे लागणार पालन)

दुकाने आणि मार्केट मध्ये सुद्धा सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात येत नसल्याचे बंद करायला लावले आहेत. संचारबंदीच्या वेळी म्हणजेच रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरुच राहणार असून अन्य गोष्टींसाठी बंदी असणार आहे. त्यामुळे संचारबंदीचे सुद्धा उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा करण्यात येईल असे ही त्यांनी म्हटले आहे. वैध कारणाशिवाय गाड्यांवरुन फिरल्यास ही कारवाई केली जाणार आहे.

सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागावे व अनावश्यक हालचाली टाळाव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोविड-19 ला पराभूत करण्याचे कार्य आपल्या सर्वांवरच आहे आणि आपण जेव्हा वैयक्तिक सुरक्षा आणि सामाजिक दूरस्थ मार्गदर्शक तत्त्वे पाळतो तेव्हाच आपण हे साध्य करू शकतो असे ही पोलिसांनी म्हटले आहे.