Representational Image | (Photo Credits: PTI)

Pune: शिरुरमधील (Shirur) न्हावरे येथे 37 वर्षीय महिलेचा विनयभंग (Molestation) करून तिचे दोन्ही डोळे निकामी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुंडलिक साहेबराव बगाडे, असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकास अधीक्षकांनी 35 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. यासंदर्भात ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Dr. Abhinav Deshmukh) यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितलं की, 3 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास न्हावरे येथे राहणारी पीडित महिला शौचास केली होती. यावेळी आरोपीने पीडितेची छेडछाड काढून तिला मारहाण केली. यामध्ये तिच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत होते. (हेही वाचा - Mumbai: नातेवाईकांच्या घरात सोनाच्या दागिन्यांची चोरी करणे महत्वाकांक्षी मॉडेलला पडले महागात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

या तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी न्हावरे परिसरात एका चायनीज सेंटरमध्ये वेटरचे काम करीत होता. आरोपीने पोलिस आपल्या बाबतीत तपास करत असल्याचे समजल्यानंतर डोक्याचे आणि दाढीचे केस पूर्णपणे काढून टाकले. आरोपीने या हॉटलमधून पळ काढला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेतला. आरोपी दारूडा असून तो नेहमी नशेत असतो. तसेच तो मुका असल्याचं सोंग करत भीक मागतो, असं पोलिसांना तपासात समजलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला शिक्रापूरमधील चाकण चौकातून ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.