रात्रीच्या अंधारात घराच्या बाजूला शौचास गेलेल्या महिलेचा (वय 37 वर्षे) अज्ञाताना विनयभंग (Molestation) केला. या वेळी झालेल्या झटापटीत आरोपीने पीडितेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पीडितेच्या डोळ्याला (Eyes) गंभीर इजा झाली असून, ते निकामी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना पुणे (Pune District) जिल्ह्यातील शिरुर (Shirur Taluka) तालुक्यात असलेल्या न्हावरे गावात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच सन्नाटा पसरला आहे. पोलिसांनी घटनेची तातडीने दखल घेत तपास सुरु केला आहे. आरोपी अद्यापही फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला ही आपल्या पतीसोबत न्हावरे गावात निवासाला आहे. हे कुटुंब एका पत्र्याच्या खोलीत राहते. घरात शौचालय नसल्याने पीडिता ही रात्री नऊच्या सुमारास शौचासाठी अंधारात गेली होती. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन झुडपात दबा धरुन बसलेल्या अज्ञात व्यक्तीने तिची छेड काढली. नराधमाच्या कृत्याला पीडितेने तीव्र विरोध केला परंतू, त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत महिलेचे डोळे निकामी झाल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, कोल्हापूर: भररस्त्यात विनयभंग केल्याने तणनाशक प्राशन करून तरुणीची आत्महत्या; आरोपींविरोधात गुन्हा दाखल)
पीडितेला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात शुरुर पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग आणि जीवघेणा हल्ला असे या गुन्हेचे स्वरुप आहे.
पुणे (ग्रामीण) पोलीसांनी घटनेची तातडीने दखल घेतली आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिली. पीडितेवर हल्ला कोणी व का केला याबाबत पोलिस सध्या तपास करत आहेत.