Coronavirus (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येला रोख लावण्यासाठी शासन आणि आरोग्य यंत्रणा योग्य ती काळजी घेत आहे. दरम्यान परराज्यातून येणा-या लोकांमुळे मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी आता कल्याण स्टेशनवर (Kalyan Railway Station) परराज्यातून रेल्वेने येणा-या प्रवाशांची अँटिजन टेस्ट (Antigen Test) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ABP माझाने याबाबतचे वृत्त दिले होते. कोरोनाची काही प्रमाणात आटोक्यात आलेली परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.

परराज्यातून महाराष्ट्रात परत येणाऱ्या नागरिकांनी 48 तास अगोदरचा आरटीपीसीआर किंवा अँटीजन टेस्ट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. रस्तेमार्गाने महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या नागरिकांबाबत या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असताना रेल्वेने येणारे नागरिक मात्र कोणत्याही टेस्टविना दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Door to Door Corona Vaccination: घरोघरी जाऊन कोरोना लस देण्याबाबत BMC च्या भूमिकेवरुन उच्च न्यायालय नाराज

कल्याण डोंबिवलीतही गेल्या महिन्यात अडीच हजारांच्या घरात गेलेली कोरोनाची आकडेवारी आज 200 पर्यंत खाली आली आहे. मात्र कल्याण रेल्वे स्टेशनद्वारे शहरात दाखल होणारे बहुतांश नागरिक हे कोणत्याही चाचण्या न करताच येत आहेत. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय अधिकारी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत काल कल्याण स्टेशनचा पाहणी दौरा केला.

मुंबईमध्ये काल (20 May) कोरोना विषाणूच्या 1425 रुग्णांची नोंद झाली असून, 1460 रुग्ण बरे झाले आहेत. काल शहरात 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 29,911 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 47,371 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 778 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.