
मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, गांजाच्या रोपाला (Cannabis Plant) शेंड्यावर फुले किंवा फळ नसेल तर त्याचे वर्गीकरण गांजा (Ganja) म्हणून करता येणार नाही. या आधारावर, मुंबई उच्च न्यायालयाने अमली पदार्थांचे व्यावसायिक प्रमाण बाळगल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निकालात म्हटले आहे की, जप्त केलेली गांजाची रोपे ज्यावर फुले किंवा फळे नाहीत ती गांजाच्या कक्षेत येत नाही.
न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने 29 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात, आरोपीच्या घरातून अमली पदार्थ नियंत्रण विभागाने जप्त केलेला पदार्थ आणि एनसीबीने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवलेले नमुने यात तफावत असल्याचे निरीक्षण नोंदवले. कुणाल कडू याने अटक टाळण्यासाठी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. एनसीबीने कुणालविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सच्या गुन्ह्याखाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
एनसीबीने एप्रिल 2021 मध्ये कडू याच्या घरातून 48 किलो वजनाच्या तीन पॅकेटमध्ये हिरव्या पानांचे साहित्य जप्त केले होते. हा हिरवा पानांचा पदार्थ गांजा असल्याचा आरोप एनसीबीने केला होता, तसेच त्यांनी म्हटले होते की, कुणालच्या घरातून जप्त करण्यात आलेला 48 किलो पदार्थ व्यावसायिक प्रमाणात येत होता. न्यायमूर्ती डांगरे यांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गांजाची व्याख्या स्पष्ट करताना सांगितले की, ‘गांजा हा भांगेच्या झाडाच्या वरच्या बाजूस फुलणारा किंवा फळ देणारा पदार्थ आहे. जेव्हा झाडावर फूल किंवा फळ देणारा पदार्थ नसतो तेव्हा त्याच्या असा वनस्पतींना गांजाच्या व्याप्तीच्या बाहेर ठेवले पाहिजे. (हेही वाचा: मुंबई पोलिसांकडून गोरेगाव परिसरात एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, तीन लाख रुपयांची रोकड जप्त)
न्यायमूर्ती पुढे म्हणाले, झाडावर पाने व फुले एकत्र फुलात असतील तो गांजा आहे, परंतु जेव्हा फळे, फुले आणि पाने एकत्र फुलत नाहीत तेव्हा तो गांजा मानला जाणार नाही. न्यायालयाने सांगितले की, सध्याच्या प्रकरणात, एनसीबीने आरोपीच्या घरातून हिरव्या पानांचे साहित्य जप्त केले आहे आणि रोपाच्या वरच्या बाजूला फुले व फळे आल्याचा उल्लेख नाही, त्यामुळे तो गांजा नाही.