कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूमुळे संपूर्ण देश पिळवटून गेला असून यातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि संपूर्ण शासकीय, वैद्यकिय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील संपूर्ण पोलिस यंत्रणा रात्रंदिवस जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पोलिसांसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे. अशा खडतर परिस्थितीत कर्तव्य बजावताना पोलिस जर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले तर त्यांच्या कुटूंबाला राज्य सरकारकडून 50 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी आज केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र हा कोविड-19 सारख्या विषाणूच्या दहशतीखाली आहे. यात लोकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यासाठी तसेच कठीण प्रसंगी त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून अजित पवारांनी आज ही महत्वपुर्ण घोषणा केली आहे. Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यावरील मोठे संकट टळले; तबलिगी जमातला वसई येथे करायचा होता कार्यक्रम
त्याचबरोबर ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ज जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ,आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.