Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यावरील मोठे संकट टळले; तबलिगी जमातला वसई येथे करायचा होता कार्यक्रम
Maharashtra Police (Photo Credits: Facebook)

देशात कोरोनाचे (Coronavirus) थैमान घातले असताना 18 मार्च रोजी दिल्लीतील (Delhi) निजामुद्दीन (Nizamuddin) परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील 500 हून अधिक लोक सहभागी झाले होते. दिल्लीमधील निझामुद्दीने मरकजमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे भारतावरील कोरोनाचे संकट अधिक गंभीर झाले आहे.तसेच या कार्यक्रमामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निझामुद्दीनप्रमाणेच तबलिगी जमातने वसईतही (Vasai) तितकाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. परंतु, महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) शेवटच्या क्षणी त्यांची परवानगी नाकारली. त्यामुळे महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट टळले आहे. अन्यथा महाराष्ट्रात कोरोना बाधीतांच्या संख्येत आणखी वाढ झाली असते.

शमीम एज्युकेशन ऍन्ड वेल्फेयर सोसासटी वसई या संघटनेचे सरचिटणीस अब्दुल कय्यूम अहमद आझमी यांनी 22 जानेवारी रोजी पालघरकच्या पोलीस अधीक्षकांकडे एका पत्राद्वारे वसईमधील दिवाणमानच्या मैदानात मेळाव्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी अधीक्षकांनी कायदा सुव्यवस्था आदीची माहिती घेत या मेळाव्याला फेब्रुवारीमध्ये परवानगी दिली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र किंवा राज्य शासनाकडून संचारबदी किंवा जनता कर्फ्यूबाबत कुठलेही आदेश नसल्याने ही परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांना दिली होती. परंतु राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मार्चमध्ये आपण या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करीत असल्याचे या कार्यक्रमाच्या आयोजकांना कळवले. त्यामुळे तबलिगी जमातीचा वसई येथे आयोजित केलेला कार्यक्रम रद्द झाला. हे देखील वाचा- Coronavirus: खाकी कपड्यावाल्या तुझे कर्ज कसे फेडू? म्हणत पोलिसांच्या कर्तव्याला भावनात्मक कवितेतून सलाम (Video)

महाराष्ट्र पोलिसांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतूक केले आहे. दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातील मशिदीत तबलिगी जमातीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अनेक राज्यातून लोक आली होती. त्यामुळे कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु, हा कार्यक्रम महाराष्ट्रात झाला असते तर, कदाचित राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या आणखी भर पडली असते, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.

भारतात आतापर्यंत एकूण 2 हजार 301 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैंकी कोरोना विषाणूमुळे 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 155 कोरोनाबाधीत रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातील नागरिक घाबरले आहेत. देशात गेल्या 24 तासांत एकूण 235 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.