IAS Puja Khedkar's Training Put On Hold: महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरच्या (IAS Puja Khedkar) अडचणीत वाढ झाली आहे. वादात सापडल्यानंतर उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने पूजा खेडकरचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. यासोबतच अकादमीने तिला तातडीने परत बोलावण्याचे पत्रही जारी केले आहे. याशिवाय अकादमीने महाराष्ट्र सरकारलाही पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले असल्याचे, अकादमीने पूजाला सांगितले आहे. या प्रकरणाबाबत तपास होणार असून, तो पूर्ण होईपर्यंत पूजा अकादमीतच राहणार आहे.
पूजा खेडकरने अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून यूपीएससी परीक्षेत सहभाग घेतल्याचा आरोप आहे. त्या आधारावर विशेष सवलती मिळवून ती आयएएस झाली. तिला ही सवलत मिळाली नसती, तर तिला मिळालेल्या गुणांच्या आधारे आयएएस पद मिळणे अशक्य होते.
पूजावर आरोप आहे की, निवड झाल्यानंतर पूजाला वैद्यकीय तपासणी करावी लागली, पण तिने ती पुढे ढकलली. विविध कारणांमुळे तिने सहा वेळा वैद्यकीय तपासणी नाकारली. नंतर तिने बाह्य वैद्यकीय एजन्सीकडून एमआरआय अहवाल सादर करण्याचा पर्याय निवडला, जो यूपीएससीने स्वीकारला. पुण्यात प्रोबेशनरी आयएएस अधिकारी म्हणून काम करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे. त्यावेळी ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली.
पहा पोस्ट-
Maharashtra: Trainee IAS officer Puja Khedkar relieved from District Training Program of State Government of Maharashtra.
The letter from Nitin Gadre, Additional Chief Secretary (P) reads, "...LBSNAA, Mussoorie has decided to keep your District Training Program on hold and… pic.twitter.com/IHXw8ZOhmw
— ANI (@ANI) July 16, 2024
आरोपांनुसार, पूजाने अनेक सुविधांची मागणी केली होती. पूजाने आपल्या वैयक्तिक ऑडी कारवर लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट लावली होती. याशिवाय तिने अधिकृत गाडी, निवास, कार्यालयीन खोली आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली. एवढेच नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत त्यांची चेंबरही ताब्यात घेतली होती. या सर्व प्रकरणानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकरची तक्रार केली होती. त्यानंतर पूजाची वाशिम जिल्ह्यात बदली झाली. त्या ठिकाणी ती सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाली. (हेही वाचा: Manorama Khedkar Video: पूजा खेडकर हिच्या आईची पोलिसांशी हुज्जत; जुन्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
हे आरोप आणि वादानंतर केंद्र सरकारने आयएएस अधिकारी पूजा खेडकरशी संबंधित वादांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. पूजा खेडकरने नागरी सेवक म्हणून तिच्या अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर ही चौकशी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पोलिसांकडून पूजाचे अपंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासले जात आहे. प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी करण्यात आली आहे.