Ashwini Bhide Deshpande (PC- Twitter)

राज्य सरकारने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (Mumbai Metro Rail Corporation Ltd. MMRCL) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे-देशपांडे (Ashwini Bhide-Deshpande)  यांना प्रधान सचिवपदी (Principal Secretary) बढती दिली आहे. अश्विनी या मेट्रो 3 च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणूनदेखील कार्यभार पाहणार आहेत. बुधवारी त्या आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

आरेतील मेट्रो कारशेडमुळे अश्विनी भिडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. सरकार बदलल्यानंतर त्यांची बदली होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता राज्य सरकारने त्यांना प्रधान सचिवपदी बढती दिली आहे. अश्विनी यांचे आएएसचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इचलकरंजीच्या साहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची पदाची जबाबदारी स्वीकारली. तसेच नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अश्विनी यांनी उत्तम विकासकामं केली. 2014 ते 15 या वर्षात त्यांनी शिक्षण खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळीही त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. (हेही वाचा - जनरल बिपीन रावत भारताचे पहिले सीडीएस; पहा Chief of Defense Staff या पदाची वैशिष्ट्यंं)

अश्विनी यांचा मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या आरे कारशेडच्या बांधकामावरून पर्यावरणवादी संघटनांमध्ये वाद झाला होता. आरे कारशेडसाठी रात्रीच्यावेळी झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये ट्विटरवर शाब्दिक वाद झाला होता.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अश्विनी यांची बदली करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, आता हा अंदाज खोटा ठरला असून उलटपक्षी महाविकास आघाडीने अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी पदोन्नती केली आहे.