Pune: मुलाच्या हव्यासापोटी पत्नीला नग्न करून पतीचे धक्कादायक कृत्य, पुण्यातील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

मुलाच्या हव्यासापोटी बुरसटलेल्या मानसिकतेतील लोक भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, अशाप्रकारच्या घटनांमुळे अनेक महिलांना मानसिक आणि शारिरिक छळाला सामोरे जावा लागत आहे. एवढेच नव्हेतर, वंशाला दिवा हवा म्हणून महिलांना गर्भपात करण्यास भाग पाडणे किंवा नवजात स्त्री अर्भकाला इतरत्र फेकून देणे, अशा प्रकारच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. यातच पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpri- Chinchwad) येथे मुलाच्या हव्यासापोटी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा फासून तिचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ऋषिकेश सुदाम बोत्रे असे या नराधम पतीचे नाव आहे. ऋषिकेशला मुलगा हवा असल्यामुळे तो त्याच्या पत्नीचा वारंवार छळ करीत असे. दरम्यान, वंशाला दिवा हवा म्हणून ऋषिकेश आणि त्याची आई एका भोंदूबाबाकडे गेले. त्यावेळी भोंदबाबाने दिलेला अंगारा आणि हळद-कुंकू घेऊन घरी आले. त्यानंतर पीडिताला कपडे काढायला सांगून तिच्या संपूर्ण शरिरावर अंगारा आणि हळद-कुंकू लावला. या प्रकारामुळे पीडित महिलेने चाकण पोलीस ठाणे गाठले आणि तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. हे देखील वाचा- Mumbai: Nude Pics पाठवण्यासाठी 10 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करणारे दोघेजण अटकेत

पीडित महिलाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तिच्या पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.

महत्वाचे म्हणजे, नागरिकांचा काळ्या जादूवरचा विश्वास नष्ट करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अंधश्रद्धा निर्मलून संस्था देशात कार्यरत आहेत. मात्र, तरीही अनेकजण अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकत चालले आहेत.