मुंबई (Mumbai) मधील भिवंडी (Bhiwandi) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 10 वर्षांच्या मुलीला नग्न फोटो (Nude Pics) पाठवण्यासाठी ब्लॅकमेल (Blackmail) करण्यात येत होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, स्नॅपचॅट (Snapchat) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) द्वारे दोन्ही आरोपी या मुलीकडे नग्न फोटोची मागणी करत होते. तिने फोटो न पाठवल्यास तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यावर ही गंभीर बाब उघडकीस आली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॉंचने दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पीडित मुलगी इयत्ता 5 वीत शिकत आहे. तिचे वडील व्यावसायिक असून आई गृहिणी आहे. सनी जनियानी (29) आणि अजय म्हात्रे (30) अशी या दोन्ही आरोपींची नावे असून गुरांना चारा पुरवण्याचे ते काम करतात. पोलिसांनी या दोघांविरुद्ध Pocso अॅक्टअंतर्गत लैगिंक छळाचा गुन्हा दाखल केला असून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.
मुलीच्या पालकांनी मेघावाडी पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. डिसीपी दत्ता नलावडे यांच्या टीमने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या लहान मुलीकडे स्नॅपचॅट अकाऊंट होते. ज्यावर आरोपींनी तिला संपर्क करुन तिच्याकडून व्हॉट्सअॅप नंतर घेतला. त्यानंतर दोघांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपींनी तिला पॉर्न व्हिडिओ आणि न्युड फोटोज देखील पाठवले. आरोपींनी जेव्हा मुलीकडे न्युड फोटोजची मागणी केली आणि तिच्या पालकांना मारुन टाकण्याची धमकी दिली त्यानंतर घाबरुन मुलीने आपल्या पालकांना याबद्दल सांगितले. (कल्याण: 6 अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका शिक्षकाला अटक)
दोन्ही आरोपींना रविवारी कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती मेघावाडी पोलिसांचे सिनियर इन्स्पेक्टर संजीव पिंपळे यांनी दिली. पालकांनी नेहमी मुलांचे ऑनलाईन अॅप्स आणि गेम्स चेक करत राहावे आणि अशी कोणतीही बाब दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.