Buldhana Shocker: खळबळजनक! पतीकडून महिला पोलीस पत्नीसह चार वर्षाच्या मुलीची हत्या; गळफास घेऊन पतीने संपवलं जीवन
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Buldhana Shocker: महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. एक महिला पोलीस अधिकारी आणि तिची मुलगी त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. तसेच महिलेच्या पतीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरापासून 15 किलोमीटर अंतरावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगाराने त्याची पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलीची हत्या करण्यासाठी धारदार हत्याराचा वापर केला. चिखली शहरातील पंचमुखी महादेव मंदिराजवळ असलेल्या त्यांच्या राहत्या घरात वर्षा कुटे या महिला अधिकारी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला.

वर्षा किशोर कुटे या पोलीस खात्यात नोकरीला होत्या, तर त्यांचे पती किशोर कुटे हे शेतकरी म्हणून काम करत होते. दुपारच्या सुमारास वर्षा आपल्या ड्युटीवरून घरी परतली होती. दुपारी 2.15 च्या सुमारास तिचा पती किशोर कुटे याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर, किशोर कुटे याने आपल्या लहान मुलीची देखील हत्या केली.

या भीषण कृत्यानंतर किशोर कुटे याने शेवरा तालुक्यातील गांगलगाव येथे 15 किलोमीटर अंतरावर पलायन केले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेतून कुटे यांची दुसरी मुलगी सुदैवाने वाचली. कारण ती शाळेत गेली होती.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या भयंकर घटनेमागील कारणांचा उलगडा करण्यासाठी अधिकारी सध्या कसून तपास करत आहेत. किशोर आणि वर्षा या जोडप्यामध्ये सकारात्मक संबंध असल्याचे म्हटलं जात आहे. या दुःखद कृत्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.