प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

मुंबईच्या समुद्रात गेल्या काही वर्षात डॉल्फिन (Dolphin) आल्याचे दिसून आले आहे. तर रविवारी पुन्हा एकदा डॉल्फिनचे मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) येथे समुद्रात दर्शन घडले आहे.

'हम्पबॅक' (Humpback) प्रजातीतील हे डॉल्फिन असल्याचे सांगितले जात आहे. या प्रजातीतील डॉल्फिन जास्तकरुन सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी येथे पाहायला मिळतात. परंतु मुंबईतल्या समुद्र किनारी या प्रजाती पाहायला मिळणे दुर्मिळ गोष्ट आहे. तसेच किनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छिमारांना गेल्या काही महिन्यात खूप वेळा डॉल्फिनचे दर्शन झाल्याचे सांगितले आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ससून डॉक येथे हम्पबॅक जातीचे डॉल्फिन दिसले होते. तर गेल्या वर्षात वर्सोवा येथे या डॉल्फिनने दर्शन दिले होते.

या प्रजातीतील डॉल्फिन हे उथळ पाण्यात जास्तकरुन आढळून येतात. यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया, मरिन्स लाईन, हाजी अली येथे हे डॉल्फिन दिसले होते. डॉल्फिन हे खासकरुन गोड्या आणि खाऱ्या पाण्यात आढळून येतात. मुंबईतल्या समुद्रात गाळ अधिक असतो परंतु थंडीच्या दिवसात जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे गाळ कमी होतो. त्यामुळेच डॉल्फिन येथे येत असल्याचे सीएमएफआरआयचे निवृत्त वैज्ञानिक विनय देशमुख यांनी 'दी इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सांगितले आहे.