महाराष्ट्रात कोणाचे किती बळ? हे समजून घेण्यासाठी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे- चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil and Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पार पडलेल्या एका मुलाखातीत भाजपवर निशाणा साधला होता. भाजप आणि शिवसेना पक्षाने युती केल्यामुळे भाजपला 105 जागा मिळाल्या अन्यथा त्यांना इतक्या जागा मिळाल्या नसत्या, असा चिमटा शरद पवार यांनी विरोधीपक्षाला काढला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या पुढील विधामसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढून आपले आजमावले पाहिजे. राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे याची एकदा चाचणी झालीच पाहिजे, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.

महाराष्ट्र विधानसभा 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपला सर्वाधिक 105, शिवसेनेला 56 अशा युतीला 161 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी व काँग्रेस यांना एकत्र लढून 98 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत भाजप- शिवसेना दोन्ही पक्ष स्वबळावर लढले असते, तर भाजपला इतक्या जागा जिंकता आल्या नसत्या, असे शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या या विधानाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूक 2014 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षात वाताहत झाली होती. त्यावेळी दोन्ही पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. याचा अनुभव असल्यामुळेच दोन्ही काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला होता, असे करूनही त्यांना आमच्या इतक्या जागा मिळवता आल्या नाहीत. मागील निवडणुकीत स्वतंत्र लढले असते तर तुमच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात कोणाचे किती बळ आहे? हे समजून घेण्यासाठी राज्यात एकदा चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे लढून आपले बळ आजमावले पाहिजे. याचा फैसला एकदा होऊनच जाऊदे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेचा दर्प, सूडाचं शूद्र राजकारण करतात- शरद पवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीकडे गेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाकडे आला होता? या मुद्द्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतील. ती खूपच गोपनीय बाब आहे. तेथे मी बोलणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखातीवर अद्याप महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांची प्रतिक्रिया आलेले नाही.