PM arendra Modi, Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi यांच्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेचा दर्प चढला आहे. त्यामुळे हे सरकार सूडाचे राजकारण करत आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी केला आहे. दै. सामनाला दिलेल्या मुलाखीचा आज तिसरा आणि शेवटचा भाग प्रदर्शित झाला. दै. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखती पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

संजय राऊत यांनी मुलाखतीवेळी 'ममता बॅनर्जी असतील किंवा ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांचे प्रमुख नेते असतील ते कायम असा आरोप करतात की नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करतात. फोडाफोडीचं राजकारणही केलं जातंय मध्यप्रदेश हे त्याचं ताजं उदाहरण आहे. प्रियंका गांधी यांनाही त्यांचे घर सोडण्यास सांगण्यात आले', असा प्रश्न विचारला. संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, 'केंद्रातील मोदी सरकारला सत्तेचा दर्प चढला आहे. कोणत्याही सरकारला एकदा का सत्तेचा दर्प चढला की ते सूडाचं राजकारण करत असतात. केंद्र सरकारही तसेच करत आहे. हे सरळसरळ दिसत आहे'. (हेही वाचा, एक शरद, सगळे गारद : संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा भाग ती इथे पाहा)

दरम्यान, शरद पवार यांनी या वेळी एक उदाहरणही सांगितले. ते म्हणाले, 'पंतप्रधान मनमोहन सिंह हे देशाचे पंतप्रधान होते. त्यावेळी गुजरात राज्यात भाजपची सत्ता होती आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. त्यावेळी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे अत्यंत तीव्र शब्दात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर टीका करत. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधानांवर इतक्या तीव्र आणि टोकाची टीका करतो हे आम्ही पहिल्यांदाच पाहिलं. असे असूनही पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही. मी त्यावेळी केंद्रीय मंत्री होतो. त्यावेळी मोदींसोबत माझे अनेक गुजरात दौरे झाले. मंत्रिमंडळात अनेक नेत्यांनी मला म्हटले ते टीका करत असताना त्यांच्यासोबत दौरे का करता. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंह असे म्हणाले, ते टीका करत असले तरी गुजरात हा देशाचा एक भाग आहे. आपण देशाच्या हिताची जपणूक करण्यासाठी येथे बसलो आहोत. त्यामुळे शरद पवार करत आहेत ते बरोबर आहे. आताच्या पंतप्रधानांच्या काळात मात्र बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत.'

एक शरद, सगळे गारद मुलाखत भाग 3

दरम्यान, आज केंद्रातील सत्ताधारी पक्ष विविध राज्यांमध्ये असलेले सरकार पाडण्याचा किंवा अस्थितर करण्याचा प्रयत्न करताना दिसतो असेही पवार या वेळी म्हणाले. प्रियंका गांधी यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले की, त्यांचे वडील राजीव गांधी, आजी इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलीदान दिले आहे. त्या आधिच्या त्यांच्या पीढ्यांनी देशासाठी अवघे आयुष्य खर्ची घाले आहे. असे असताना त्यांना घराबाहेर काढणे योग्य नव्हे. हे शूद्र राजकारण आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.