शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (CIDCO) 2023 च्या अखेरीस गृहनिर्माण योजना 2019 च्या घरमालकांना घरांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले आहे. या गृहनिर्माण योजनेची लॉटरी 2022 च्या सुरुवातीला काढण्यात आली होती. ड्रॉ काढून जवळपास दीड वर्ष झाले तरी लोकांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही. अशा लोकांना सिडकोच्या आश्वासनानंतर दिलासा मिळाला आहे.
या लॉटरीमध्ये ज्या गृहखरेदीदारांची नावे आली होती आणि ज्यांनी गृहकर्ज घेऊन पैसे भरले होते ते त्यांच्या घराबाबत खूप चिंतेत होते. घरांच्या कर्जासाठी त्यांना बँकेत ईएमआय भरावा लागत आहे, तसेच त्यांना भाड्याच्या घरातही राहावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मनसेचे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी सोमवारी सायंकाळी घरांच्या ताब्याबाबत सिडकोचे मुख्य अभियंता यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान, अधिकाऱ्याने आश्वासन दिले की, गृहनिर्माण योजना 2019 चा ताबा डिसेंबर 2023 अखेर दिला जाईल. अधिकाऱ्याने ताबा देण्याबाबत लेखी आश्वासनही दिले आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे.
राज्य सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणांतर्गत सिडकोने 2018-2019 च्या गृहनिर्माण योजनेंतर्गत विविध आर्थिक विभागांसाठी सुमारे 25,000 घरांसाठी लॉटरी काढली होती. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोड्समध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि निम्न उत्पन्न गटासाठी (LIG) घरे विकसित करण्यात आली आहेत. ड्रॉमध्ये नावे आलेल्या यशस्वी अर्जदारांना संगणकीकृत लॉटरी प्रणालीद्वारे कागदपत्रांची छाननी केल्यानंतर, त्यांच्या घराच्या एकूण किमतीपैकी विशिष्ट हप्त्याची रक्कम विहित कालावधीत भरण्याचे वेळापत्रक प्रदान करण्यात आले होते. मात्र अजूनही घरांचा ताबा मिळाला नव्हता. (हेही वाचा: Marathwada Water Storage: जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ; मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार?)
दरम्यान, सिडको शहरात सुमारे 90,000 घरे बांधत आहे, त्यापैकी 65,000 परवडणारी घरे आहेत. वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर बस टर्मिनस, खारघर बस डेपो, कळंबोली बस डेपो, पनवेल आंतरराज्य बस स्टँड, नवीन पनवेल (प) बस डेपो आणि खारघर सेक्टर 43, तळोजा सेक्टर 21, 28, 29, 31, 37 यासह विविध ठिकाणी ही घरे बांधली जात आहेत.