Dilip Walse-Patil | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी शनिवारी मशिदींमधून लाऊडस्पीकर काढण्याची शक्यता नाकारली आहे. नियमांचे जर कोणी उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे राज्याच्या गृहमंत्र्यांनी एएनआयला सांगितले. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवू नयेत, असे न्यायालयाने सांगितले. ज्या मशिदींनी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे, त्यामधील लाऊडस्पीकर काढण्याचा प्रश्नच येत नाही. लोकांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, पाटील पुढे म्हणाले.

गुरुवारी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितले होते की सरकार राज ठाकरेंच्या धमकीकडे गांभीर्याने विचार करत आहे. आगामी सणाच्या हंगामासाठी तयार असल्याचे सांगितले होते. हनुमान जयंतीसह आगामी सणांसाठी पोलीस सज्ज आहेत. आम्ही कोणालाही या राज्यातील वातावरण बिघडवू देणार नाही, असे पीटीआय या वृत्तसंस्थेने पाटील यांच्या हवाल्याने म्हटले आहे. हेही वाचा Jitendra Awhad on Chandrakant Patil: मी पोहोचलो रे हिमालयात!, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला चंद्रकांत पाटील यांचा फोटो

3 एप्रिल रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेला संबोधित करताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी राज्य सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर काढून टाकण्यास सांगितले. त्यानंतर मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवण्याचा इशारा दिला. मी नमाजाच्या विरोधात नाही, तुम्ही तुमच्या घरी नमाज पढू शकता, पण सरकारने मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत निर्णय घ्यावा. मी आता इशारा देत आहे. लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवू, असे ठाकरे म्हणाले होते.

12 एप्रिल रोजी ठाकरे यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याच्या  मागणीचा पुनरुच्चार केला . शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने 3 मे पूर्वी मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाहीत, तर आम्ही स्पीकरसह हनुमान चालीसा वाजवू. हा सामाजिक प्रश्न आहे, धार्मिक नाही. मी राज्य सरकारला सांगू इच्छितो, आम्ही या विषयावर मागे हटणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असे मनसे प्रमुख ठाण्यात म्हणाले.