Organ Sale by Farmer: कर्ज फेडण्यासाठी अवयवाची विक्री, शेतकऱ्याकडून दरपत्रक जारी, मुख्यमंत्र्यांना निवेदन
Farmers | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Hingoli News: शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी कर्जाचे हप्ते कसे फेडायचे आणि कर्जमुक्त जीवन कसे जगायचे याबाबत शेतकरी मोठ्या प्रमाणावर चिंतेत आहेत. अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. शेतकरी आत्महत्या हा मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यातच आता हिंगोली येथील शेतकऱ्याने घेतलेली भूमिका नव्याने सामाजिक चिंतेचा विषय ठरु पाहात आहे. येथील सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांनी चक्क स्वत:चे अवयव विक्रीला काढले आहेत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या शेतकऱ्यांनी किडनी (Kidney), लिव्हर (Liver), डोळे (Eyes) व इतर अवयव विकायला काढले आहेत. आमचे अवयव विकत घ्या आणि आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणीच्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवदेनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीसाठी दरपत्रक

किडनी-75 हजार

लिव्हर- 90 हजार

डोळे- 25

शेतमालाला भाव नाही, कर्ज कसे फेडायचे?

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला, शेतमालाला भाव नाही. सोयाबीन (Soybeans), कापूस (Cotton) घरात, शेतात पडून आहे. असे असताना त्याची दखलही घेतली जात नाही. जर शेतकऱ्यांकडे पैसेच आले नाहीत तर शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे? कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Aurangabad Young Farmer Couple Suicide: औरंगाबाद मध्ये दीड वर्षाच्या लेकी समोर तरूण शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या)

सोनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी किडणी, लिव्हर आणि डोळे अनुक्रमे, 75, 90, 25 हजार रुपयांना विकत घ्या आणि कर्ज फेडण्यासाठी निधी द्या, असे म्हटले आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

'शेतकरी आत्महत्येबाबतही गांभीर्याने विचार होणे आवश्यक'

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेतीचा 17% वाटा आहे. तर, एकूण लोकसंख्येच्या 22% जनता (2011 च्या जनगणनेनुसार) शेतीमध्ये गुंतलेली आहे. ही आकडेवारी पाहता कृषी क्षेत्राचे देशातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे पुढे येते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येबाबतही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या संदर्भात आणि मानवतावादी दृष्टिकोनातून, शेतकरी आत्महत्येच्या शोकांतिकेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शेती आणि शेतकरी आत्महत्या या विषयाचे अभ्यासक सांगतात, वेगवेगळ्या सरकारांनी वेळोवेळी वेगवेगळे अल्प-मुदतीचे उपाय शोधून काढले आहेत जे समस्येची मूळ कारणे शोधत नाहीत आणि त्यामुळे आत्महत्येचे धोके कमी होत नाहीत. असे उपाय लोकवादी "विशेष पॅकेजेस" च्या स्वरूपात येतात जे पूर्वाभिमुख दीर्घकालीन धोरणाच्या स्वरूपाऐवजी प्रतिगामी असतात. शिवाय, अनुदान, कर्जमाफी, पीक विमा आणि इतर कल्याणकारी योजना यासारख्या उपाययोजना अयोग्य अंमलबजावणीमुळे अयशस्वी झाल्या आहेत.