Hingoli Earthquake: हिंगोली जिल्ह्यात औंढा, कळमनुरी तालुक्यात  3.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
Earthquake | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील काही गावांना भूकंपाचे (Earthquake in Hingoli) धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी (10 सप्टेंबर) रात्री 10.27 वाजता उशीरा हे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.3 रिश्टर स्केल इतकी झाल्याची माहिती आहे. प्रामुख्याने औंढा (Aundha) आणि कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील पिंपळदरी, कुरुंदा, बोल्डा, पांगराशिंदे यांसह इतर काही गावांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कोठेही जीवित अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या परिसरात या आधीही असे धक्के अनेकदा जाणवले आहेत.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ कळमनुरी व वसमत तालुक्यात पाठिमगील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. प्रामुख्याने या तालुक्यांतील 23 गावे अशी आहेत. जी वसलेल्या ठिकाणी पृथ्वीच्या भूगर्भातून हादरे, मोठे आवाज जाणवतात. (हेही वाचा, Kolhapur Earthquake: कोल्हापूर जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के, कळे गावात 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप)

कोणकोणत्या तालुक्यांत भूकंप

औंढा तालुका- पिंपळदरी, राजवाडी, सोनवाडी, जलालदाभा, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी

कळमनुरी तालुका- नांदापूर, शिंदगी, बोल्डा, पोत्रा या भागात मोठा आवाज जाणवला. हिंगोली

भूकंपाचे धक्के बसताच नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. नागरिकांनी तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला. त्यांनीही पृथ्वीच्या भूगर्भातून काही आवाज आल्याचे आणि हलक्या प्रमाणात भूकंपाचे धक्केही जावल्याचे सांगितले. दरम्यान, भूकंपामुळे कोठेही जीवित अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या परिसरात या आधीही असे धक्के अनेकदा जाणवले आहेत.