Sanjay Raut | (Photo Credit- X)

त्रिभाषा सूत्रास (Three-language Formula) अनुसरुन महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची (Hindi Language Compulsory) करण्याबाबतचा शासन निर्णय आदेश (Government Resolution) अर्थातच जीआर (GR) रद्द करण्याचा निर्णय राज्य सकारने घेतला. मात्र, केंद्र सरकारचा हिंदी सक्ती करण्याचा निर्णय, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच स्वीकारल्याचे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना समर्थक सांगतात. यावर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढलेला जीआर आम्ही जाळला. ते जर म्हणत असतील, ठाकरे मुख्यमंत्री असताना जीआर काढला असेल तर तो त्यांनी दाखवावा. इतकेच नव्हे तर शिवसेना भवनासमोरील गडकरी चौकात तो जाळावा, आम्ही त्यांना साफसफाई करुन देऊ, असे आव्हानच संजय राऊत यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांना दिले आहे.

'तो अहवाल, जीआर लोकांसमोर आणा'

भाजप ही खोटारड्यांची टोळी आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका, असे अवाहन करतानाच शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, हे जे भाजपवाले किंवा इतर कोणी हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या काळात झाला असे सांगता, त्यांना माझे आव्हान आहे. त्यांनी त्याबाबतचा एखादा जीआर, अहवाल लोकांसमोर मांडावा. हिंदी सक्तीचा जीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काढला आहे. त्यामुळे आम्ही हिंदीसक्तीस विरोध करताना हा जीआर जाळला. जर भाजप किंवा इतरांकडे कोणाकडे उद्धव ठाकरे यांनी काढलेला जीआर असेल तर तो त्यांनी जनतेसमोर ठेवावा. इतकेच नव्हे तर, हा जीआर त्यांनी शिसेना भवनासमोर असलेल्या गडकरी चौकात जाळावा, आम्ही त्यांना ती जागासुद्धा साफ करुन देऊ, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. (हेही वाचा, Raj Thackeray-Uddhav Thackeray: शिवसेना (UBT) आणि मनसे यांचा एकत्र मेळावा; उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर)

दरम्यान, शिवसेना (UBT) आणि मनसे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत. या दोन्ही पक्षांचा एक संयुक्त मेळावा मुंबई येथील वरळी डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षातून बाहेर पडत स्वत:चा वेगळा राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर दोन्ही बंधूंमध्ये जोरदार राजकीय संघर्ष निर्माण झाला. असे असले तरी, प्रदीर्घ काळ परस्परांविरोधात लढल्यानंतर देखील आता हे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याचे पाहून महाराष्ट्रातही उत्सुकता निर्माण झाली आहे. या संयुक्त मेळाव्यात दोन्ही बंधू कोणती भूमिका मांडतात याबाबत तमाम महाराष्ट्रास आणि मराठी माणसासही प्रतिक्षा आहे.