महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेचे (Maharashtra Government formation) काही तास बाकी असताना देखील सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजप (BJP) पक्षातील बड्या नेत्यांकडून अद्यापही का हालचाली सुरु झालेल्या नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. त्यात प्रामुख्याने अमित शाह (Amit Shah) यांनी मौन का पळाले आहे असा देखील सवाल अनेकांना पडला आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी लागले असले तरी भाजप ने हरियाणात मात्र दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला एकत्र घेऊन सरकार स्थापन केले आणि त्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे अमित शाह यांनी. पण महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत ते काहीही बोलताना दिसत नाहीत.
तसेच रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांची अमित शाह यांच्यासोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा शाह म्हणाले, "मी आता महाराष्ट्रात येऊन काही फायदा नाही. भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा."
अमित शाह यांच्या मौनामागचं खरं कारण काय?
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत याचं कारण सांगितलं आहे. म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं शिवसेनेला वचन दिलं होतं, की विधानसभेत विजय मिळवल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्यात येईल. हे निवेदन लोकसभेच्या जागावाटपानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर दिलं होतं. यावेळी अमित शाह आणि उद्धव ठाकरेही उपस्थित होते."
"पण दिवाळीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काहीच ठरलं नव्हतं, अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात अशापद्धतीची बोलणी झाली असल्यास आपल्याला माहिती नाही, असं वक्तव्य केलं. यामुळे मग उद्धव ठाकरे यांनी कठोर पवित्रा घेतला. आता अमित शाह राज्यात आल्यास माध्यमांसमोर त्यांना लोकसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेनेला दिलेलं आश्वासन मान्य करावं लागेल म्हणून ते महाराष्ट्रात येत नाहीत," असं विजय चोरमारे यांचं मत आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना भवनावर तर शरद पवार 'सिल्वर ओक'वर घेणार महत्त्वाच्या भेटी गाठी
तर दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार मंगेश वैशंपायन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, "मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं ताठर भूमिका घेतली आहे. ते पाहता अमित शाहांनी राज्यात येणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण करणं, असं आहे. आधी 30 ऑक्टोबरला ते राज्यात येणार होते, नंतर 3 नोव्हेंबरला येणार असं ठरलं. पण या दोन्ही वेळा शिवसेनेनं केलेल्या वक्तव्यामुळे अमित शाहांनी राज्यात येऊ नये, असं वातावरण तयार झालं."