Rain | Image used for representational purpose | (Photo Credits: @NarimanPatel/ Twitter)

Rain Update In Maharashtra: आज मुंबई, ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, मुंबई नंदुरबार, धुळे जळगाव, पालघर, नाशिक जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. सोमवारी नंदुरबार, धुळे, मुंबई, सिंधूदुर्ग, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात मुंबई, कोकण, घाट परिसरात आणि विदर्भातील बहुतेक विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: मुंबई, कोकण, घाट परिसरात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता)

सध्या पाऊस मुंबईच्या दिशेने सरकत असल्याचंही भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी सांगितलं आहे. कोकण विभागात रायगड, मुंबई, ठाणे आणि अरबी समुद्रावर दक्षिणेकडून उत्तरेकडे ढग सरकत असल्याचंही होसाळीकर यांनी म्हटलं आहे. अरबी समुद्रात ढगांची दाटी निर्माण झाल्याने रायगड, दक्षिण मुंबईमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.