Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

मुंबई, ठाणे, नवी मुंबई सह देशभरामध्ये आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हवामान अंदाजानुसार वर्तवलेल्या शक्यतेप्रमाणे आज (22 सप्टेंबर) मुंबई, ठाणे शहर आणि आजुबाजूच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर आयसोलेटेट भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो. मुंबई मध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. वारा देखील वाहत आहे. दरम्यान मागील काही तासांत मुंबई सह आजुबाजूच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर असणार्‍या कोकण परिसरामध्ये घाट माथ्यावर आज ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान तेथे मान्सूनला पुरक वातावरण आहे. सोबत वेधशाळेच्या अंदाजानुसार या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठराविक ठिकानी अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र हवामान अंदाज 2020

मुंबईमध्ये आज सकाळपासून चांगलाच पाऊस झाल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. काही सखल भागात थोडं पाणी साचण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आज मुंबईकरांनी बाहेर पडताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरीही पावसाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन संबंधित कार्यालयाकडूनही करण्यात आले आहे. पावसाच्या अलर्ट्स बाबत सरकारी यंत्रणांकडून दिल्या जाणार्‍या माहितीवर विश्वास ठेवा.