Heat Wave Alert In Maharashtra: पुढील 3 दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट; हवामान विभागाने 12 जिल्ह्यांना दिला Yellow Alert
उष्णता, प्रातिनिधिक प्रतिम (Photo Credits: JBER)

Heat Wave Alert In Maharashtra: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) असणार आहे. हवामान विभागाने राज्यातील 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. हवामान खात्याने यासंदर्भात इशारा दिला आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेसंदर्भात नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेची लाट वाढली आहे. पुढील दोन ते तीन दिवस या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेचा चटका वाढणार आहे. (हेही वाचा - Nanded: नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली गंभीर दखल)

याशिवाय मध्य महाराष्ट्रातील काही भागातील पारा वाढला असून, विदर्भात 9 ते 11 एप्रिल या कालावधीत पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दक्षिणेकडील बहुतांश भागांसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारतातील बहुतांश राज्ये उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. एप्रिलचा पहिला आठवडा सुरू असून रणरणत्या उन्हामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भाग आणि मध्य भारतात पुढील पाच दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. या राज्यांमध्ये उष्णतेची लाट किंवा उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

IMD नुसार, राजस्थान, उत्तर प्रदेश, दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा-दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये पुढील 5 दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील 3 दिवस गुजरातच्या उत्तरेकडील भागात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप राहील. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश, विदर्भ, बिहारचा काही भाग आणि जम्मू प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.